‘या’ सवयी बनवेल तुमची मॉर्निग गुड

  सकाळी झोपेतून उठल्यानंतर गुडमॉर्निंग-सुप्रभातच्या संदेशांचे आदान-प्रदान केले जात असले, तरी अनेकांना बऱ्याचदा अगदी सकाळपासूनच कंटाळवाणे वाटायला सुरुवात होते. त्यामुळे आपला संपूर्ण दिवसच कंटाळवाणा जातो. सकाळ प्रसन्‍न असेल, तर ती प्रसन्‍नता आपल्या दिवसभराच्या कामांत दिसते. खाली दिलेल्या काही उपायांनी तुम्ही तुमची सकाळ प्रसन्‍न बनवू शकता…

  फिरायला जाणे
  जर तुम्हाला सकाळी लवकर उठणे जमत असेल आणि तुम्ही पहाटे उठत असाल, तर आपला ट्रॅक सूट घालून फिरायला जायला बाहेर पडा. सकाळच्या ताज्या हवेत व वातावरणात फिरायला बाहेर पडल्यामुळे तुमच्या शरीराबरोबरच मनावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. प्रदूषणरहित वातावरणात, निसर्गाच्या सान्‍निध्यात मॉर्निंग वॉक केल्यामुळे मिळणारी ऊर्जा, चैतन्य हे इतर कोणत्याही औषधानेही मिळणार नाही. त्यामुळे ‘गुडमॉर्निंग’साठी ‘वॉकिंग’ आवश्यकच आहे.

  चहा, पेपर आदी
  सकाळी फिरायला जाऊन आल्यावर एक कप चहा आणि बिस्किटे व त्यासोबत वाचायला पेपर किंवा मासिक  असेल तर त्याची मजा काही औरच! सकाळच्या थोड्याशा थंड वातावरणात असे केल्याने पुढील कामासाठी एक उत्साह संचारतो.

  स्नान
  आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी स्नानाचे महत्त्व सर्वाधिक आहे. त्याचबरोबर आपण दिवसभर ताजेतवाने, फ्रेश राहण्यासाठीही स्नान आवश्यक आहे. अंघोळ केली नसेल तर आपल्याला फ्रेश वाटत नाही याचे कारण हेच आहे. केवळ अंगावरून पाणी घेणे म्हणजे स्नान नसून, संपूर्ण अंगाची स्वच्छता करणे, अंग स्वच्छ घासून पुसणे यामुळे शरीरातील रक्‍ताभिसरण वाढते. त्यामुळेच आपल्याला अंघोळीमुळे ताजेतवाने वाटते. शक्यतो स्नानासाठी गार वा कोमट पाण्याचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावीत. यामुळे विविध रोगजंतूंपासून, त्वचाविकारांपासून बचाव होण्यास मदत होते. तसेच अंघोळीचा साबण हा आयुर्वेदिक वापरावा. केवळ सुगंधाला वा जाहिरातींना भुलून कोणताही साबण निवडू नये. अंघोळ करताना हाता-पायांचे कोपरे, बोटांमधील जागा, पायाचे तळवे, पायाच्या बोटांमधील जागा, घोटा आदी सर्व भाग स्वच्छ करावेत. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो दोनवेळा अंघोळ करावी.

  नाश्त्यात बदल
  दररोज नाश्त्याचा एकच प्रकार वा काही ठराविक प्रकार यांना फाटा देऊन काही नवीन पद्धती अवलंबाव्यात. अंड्यापासून ते काही शाकाहारी पदार्थांपर्यंत कुठलीही; पण नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी वापरून पाहावी. काही स्वादिष्ट व आरोग्यदायी पदार्थांचा आपल्या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये समावेश करावा.

  सकाळची सुरुवात सकारात्मकतेने
  सकाळची सुरुवात सकारात्मक असेल, तर संपूर्ण दिवस सकारात्मक  जातो. त्यामुळे सकाळची सुरुवात सकारात्मकतेने करावी. त्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने यांचा अवलंब करावा. मंद संगीताचाही यासाठी चांगला फायदा होईल. तसेच सकाळचे जे वाचन कराल ते शक्यतो नकारात्मक असणार नाही याचीही काळजी घ्यावी. एकूणच, सकाळी कुठल्याही वाईट गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नये. कोणत्याही कटू भावनांवर मात करण्याचा प्रयत्न करावा.

  झोपताना करावयाची तयारी
  दररोज रात्री झोपताना उद्याच्या कामांची जास्तीत जास्त तयारी करून ठेवावी. आपल्या दिवसाचे नियोजन करताना यासाठी रात्रीचा वेळ राखून ठेवावा. यामुळे सकाळचा वेळ वाचून त्या वेळात तुम्हाला इतर आनंददायी गोष्टी करता येतात. रात्रीचे जागरण टाळावे. कारण, त्यामुळे अ‍ॅसिडिटी वाढण्याची, डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. परिणामी, त्याचा दुसर्‍या दिवसावर प्रतिकूल परिणाम होतो. दिवसाची सुरुवात उत्तम आणि आनंदात झाली, तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसभराच्या कामांवर होतो. त्यामुळे संपूर्ण दिवस उत्तम जाण्यासाठी आपली सकाळ प्रसन्‍न बनवा.