kol caves

महाड(mahad) शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोल येथील लेणी समूह(kol caves) अद्यापही उपेक्षेचा ऊन-पाऊस झेलत असल्याचे पहावयास मिळते. हा लेणीसमूह देखील भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी अद्यापही हा लेणीसमूह दुर्गमच राहिला आहे.

– रोहन शिंदे

महाड(mahad) तालुक्यातील गंधारपाले येथील लेणी(caves) प्रसिध्द आहेत. महाडपासून काही अंतरावर मुंबई – गोवा महामार्गालागतच गंधारपाले येथील हा लेणी समूह असल्याने मुंबई – गोवा महामार्गावरून हा लेणी समूह सहज दिसतो आणि आपोआप पर्यटकांची पावले या लेणी समूहाकडे वळतात.मात्र कोल येथील लेणी समूहाविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे.

पूर्वी गंधारपाले लेणी समूहात जाण्यासाठी खडतर अशी पायवाट होती. मात्र अलीकडच्या काळात भारतीय पुरातत्व विभागाने महामार्गापासून थेट लेण्यांपर्यंत पायरी मार्ग तयार केल्याने या लेणी समूहात भेट देणे सहज साध्य झाले आहे.  मात्र महाड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोल येथील लेणी समूह अद्यापही उपेक्षेचा ऊन-पाऊस झेलत असल्याचे पहावयास मिळते. हा लेणीसमूह देखील भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी अद्यापही हा लेणीसमूह दुर्गमच राहिला आहे.

कोल लेणी समूहाचे काम सातवादन काळात झाले असावे, अशी शक्यता या ठिकाणी आढळलेल्या ब्राम्ही लिपीतील शिलालेखावरून वर्तविण्यात येते. या लेणी समूहात अद्याप सात लेणी आढळून आली आहेत. कोल गावामागे असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. येथे जाण्यासाठी झाडेझुडुपे आणि काट्याकुट्यांनी भरलेली एक खडतर पायवाट आहे. पुरातत्व विभागाने ही लेणी ताब्यात घेतली असली तरी त्या ठिकाणी लेण्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सर्व लेणी आतून-बाहेरून माती आणि झाडाझुडपांनी भरलेली आहेत. परिणामी आजही या लेण्यांवर कोरीव काम दृष्टिपथात येत नाहीत. मात्र लेण्यासंदर्भात अत्यंत त्रोटक माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार या लेणी समूहाततील पहिले लेणे भिख्खू निवास, दुसऱ्या क्रमांकाचे लेणे विहार, तिसऱ्या क्रमांकाची लेणे संघाराम, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे लेणे भिख्खू निवास, सहाव्या आणि सातव्या क्रमांकाचे लेण्यात संघाराम आणि भिख्खू निवास असावी अशी
शक्यता आहे.

दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यात पूजा स्थळ असावे. या ठिकाणी काही नाणी सापडल्याचे गावकरी सांगतात. या लेण्याच्या डाव्या बाजूला एक शिलालेख आढळून येतो. ‘ठरट गृहपतीचा मुलगा श्रेष्टी संघरखित याने हे धम्मलेन दान’ दिल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. विहाराच्या आत डाव्या बाजूला एक खोली देखील आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये ही लेणी दान देणाऱ्या सिवदत्त आणि सिवदत्त यांची पत्नी धम्मसिरी यांचा उल्लेख आहे. ही सर्व लेणी आतून-बाहेरून मातीने भरलेली असल्यामुळे आपले मूळ सौंदर्य हरवून बसली आहे. राज्य सरकारने भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून या भागात संशोधन केल्यास आणखी काही लेणी आढळून येण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाने लेण्यांकडे जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग आणि लेण्यांची स्वच्छता केल्यास या ठिकाणीही पर्यटन पर्यटनाला चांगले दिवस निश्‍चितपणे येऊ शकतात.