ही मंदिरे आहेत एक हजार वर्षांहूनही अधिक प्राचीन

बिहार राज्यातील कैमुर जिल्ह्यामध्ये कौरा या ठिकाणी असलेल्या मुंडेश्वरी डोंगरावर मुंडेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवशंकर आणि पार्वती यांना समर्पित हे मंदिर असून, हे मंदिर दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण केले गेले आहे.

  प्राचीन आणि वैभवसंपन्न असा भारतीय संस्कृतीचा लौकिक आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मांची ही जन्मभूमी. इतक्या धर्मांचे आणि संस्कृतींचे मिश्रण या देशामध्ये असल्याने या संस्कृतींची प्रतीके असलेली अनेक प्राचीन धर्मस्थळे या देशामध्ये असल्यास नवल नाही. ही प्रार्थना स्थळे, देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये अस्तिवात असून, या मंदिरांची शिल्पकला आणि रचनापद्धती तत्कालीन वास्तुकलेची उत्तम उदाहरणे म्हणता येऊ शकतील. यातील काही मंदिरे एक हजार वर्षांहून ही प्राचीन आहेत.

  – महाराष्ट्र राज्यातील एलोरा लेण्यांमध्ये उभे असलेले कैलास लेणे, आणि त्यातील कैलासनाथ मंदिर, इतिहासकार आणि वास्तूकारांसाठी तत्कालीन वास्तुशैलीच्या अभ्यासाची मोठी पर्वणीच म्हटली पाहिजे. एका अवाढव्य खडकातून वरपासून कोरले गेलेले हे मंदिर पल्लव शैलीच्या वास्तुकलेचे उदाहरण आहे. आठव्या शतकामध्ये निर्माण केलेले हे मंदिर राष्ट्रकुट राज्यकर्त्यांच्या शासनकाळामध्ये निर्मिलेले असून, या मंदिरामध्ये कैलासनाथ, म्हणजेच शंकर हे आराध्य दैवत विराजमान आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये इतरही मंदिरे असून, यातील तीन मंदिरे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांना समर्पित आहेत.

  – तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे असलेले आदि कुंभेश्वर मंदिर नवव्या शतकामध्ये चोला शासन कर्त्यांनी बनवविले. या मंदिराचा परिसर 30, 181 चौरस फुटांच्या विशाल क्षेत्रामध्ये विस्तारलेला असून, सोळाव्या शतकामध्ये विजयनगरच्या शासनकाळामध्ये या मंदिराच्या आसपास आणखीही अनेक निर्माणकार्ये केली गेली.

  –  दक्षिण भारतातील अतिशय सुंदर मंदिरांमध्ये आदि कुंभेश्वर मंदिराची गणना केली जाते. या मंदिरामध्ये आदि कुंभेश्वर, म्हणजेच शिवशंकर शिवलिंगाच्या रूपामध्ये विराजमान आहेत. शंकरांची अर्धांगिनी पार्वती, मंदिरामध्ये ‘मंगलांबिगाई अम्मन’च्या रूपामध्ये विराजमान आहे. तमिळनाडू राज्यामध्ये महाबलीपुरम हे ठिकाण असून येथील मंदिर विशाल समुद्राच्या किनारी उभे आहे. सातव्या शतकामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर पल्लव वंशाचे राजे दुसरे नरसिंहवर्मन यांच्या शासनकाळामध्ये निर्मिले गेले होते. या परिसरामध्ये एकूण तीन मंदिरे आहेत. यामध्ये दोन मंदिरे मोठी, तर एक मंदिर लहान आहे.

  – कर्नाटक राज्यातील बदामी येथील गुफा आणि मंदिर, प्राचीन काळी ‘वातपी’ या नावाने ओळखले जात असे. हे मंदिर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात बदामी या ठिकाणी आहे. हे ठिकाण इसवी सन 540 ते 757 या काळामध्ये बदामी चालुक्य शासकांच्या अधिपत्याखाली होते. चालुक्य राजवंशाच्या पुलकेशी (पहिले) राजाच्या शासनकाळामध्ये बदामीच्या मंदिराचे निर्माण करण्यात आले. भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून या मंदिराची ख्याती आहे. बदामी येथील हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे प्रतीक असणाऱ्या गुफा सहाव्या शतकातील आहेत.

  – बिहार राज्यातील कैमुर जिल्ह्यामध्ये कौरा या ठिकाणी असलेल्या मुंडेश्वरी डोंगरावर मुंडेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवशंकर आणि पार्वती यांना समर्पित हे मंदिर असून, हे मंदिर दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण केले गेले आहे. संपूर्णपणे पाषाणाचे बनलेले हे मंदिर अष्टकोनी आहे. या मंदिराच्या चहु बाजूंनी दरवाजे आणि खिडक्या असून, मंदिराच्या सभामंडपात अनेक सुंदर शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही द्वारपाल, गंगा, यमुना, व तत्सम अनेक मूर्ती आहेत. या मंदिरामध्ये देवी मुंडेश्वरी आणि चतुर्मुख शिवलिंग आहे. मुंडेश्वरी देवीची मूर्ती दशभुजा असून, हे महिषासुरमर्दिनीचे रूप आहे.