अजब गावांची गजब गोष्ट; या गावातली प्रत्येक व्यक्ती आहे चेस चॅम्पियन

उन्नीकृष्णन दुसऱ्या गावामध्ये कामानिमित्त काही काळ स्थायिक झाला असता तिथे त्याने बुद्धीबळ खेळण्याचे कौशल्य आत्मसात केले. जेव्हा उन्नीकृष्णन आपल्या गावी परतला, तेव्हा त्याने गावामध्ये एका लहानसे चहाचे दुकान सुरु केले, आणि त्याच्या दुकानामध्ये नियमित चहा पिण्यास येणाऱ्या ग्रामस्थांना त्याने बुद्धीबळ शिकविण्यास सुरुवात केली.

    एखादे खेडेगाव म्हटले, की टुमदार घरे, लहानशी बाजारपेठ, गावाच्या जवळच झुळझुळ वाहणारी नदी, हिरवीगार कुरणे, कुरणांमध्ये चरत असलेल्या गाई-म्हशी, पिकांनी लहरणारी शेते, गावाकडची साधी, पण दिलदार ग्रामस्थ मंडळी, असे काहीसे दृश्य आपल्या डोळ्यांच्या समोर सहज उभे रहाते.

    – जगामध्ये अस्तित्वात असलेली बहुतेक सर्वच खेडेगावे या वर्णनामध्ये चपखल बसतील. मात्र याला देखील काही अपवाद आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर आफ्रिकेतील बुर्कीना फासो या गावाचे देता येईल. या गावामध्ये गेली सहाशे वर्षे माणसे आणि मगरी एकत्र नांदत आहेत. अशीच अनेक अजब गावे या जगामध्ये अस्तित्वात आहेत.

    – रशियातील त्सोव्क्रा नामक एक अजब गाव आहे. ग्रेटर कॉकस पर्वताच्या कुशीमध्ये वसलेले हे लहानसे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांची खासियत अशी, की या गावातील हाती पायी धड असलेल्या प्रत्येक व्यक्तिला दोरीवरून चालणे शिकविले जाते. किंबहुना कोणतेही शारीरिक व्यंग नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला दोरीवरून चालता आलेच पाहिजे असा या गावातला दंडक आहे. ही परंपरा या गावामध्ये गेली शंभर वर्षे चालत आली असून, ही परंपरा कशी सुरु झाली यामागे मोठी रोचक हकीकत आहे.

    असे म्हटले जाते, की त्या काळी गावातील तरुणांना दुसऱ्या गावांमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेमिकांना भेटण्यास जाण्यासाठी दोन डोंगरांच्यामध्ये असलेली खोल दरी पार करून जावे लागत असे. त्यातील काही बहाद्दर तरुणांनी हे अंतर दोरीवरून चालत पार केले. तेव्हापासून दोरीवरून चालत जाऊ शकणारे तरुण अतिशय हिम्मतवाले मानले जाऊ लागल्याने दोरीवरून चालत जाणे हे प्रतिष्ठेचे प्रतीक समजले जाऊ लागले.

    – भारतामध्ये केरळ राज्यातील मारोत्तीचल गावातील बहुतेक सर्व ग्रामस्थ बुद्धीबळ खेळण्यात निष्णात आहेत. म्हणूनच या गावाचा उल्लेख ‘ भारताचे चेस व्हिलेज’ असा केला जात असतो. पन्नास वर्षांपूर्वी हे गाव केरळमधील इतर गावांसारखेच होते. गावातील बहुतेक पुरुष मंडळी मद्याच्या आहारी गेलेली होती. दिवसभर मद्यप्राशन करणे आणि जुगार खेळणे इतकाच काय तो उद्योग गावातील पुरुष मंडळींना होता. त्यावेळी मूळचा याच गावात राहणारा उन्नीकृष्णन दुसऱ्या गावामध्ये कामानिमित्त काही काळ स्थायिक झाला असता तिथे त्याने बुद्धीबळ खेळण्याचे कौशल्य आत्मसात केले. जेव्हा उन्नीकृष्णन आपल्या गावी परतला, तेव्हा त्याने गावामध्ये एका लहानसे चहाचे दुकान सुरु केले, आणि त्याच्या दुकानामध्ये नियमित चहा पिण्यास येणाऱ्या ग्रामस्थांना त्याने बुद्धीबळ शिकविण्यास सुरुवात केली. हळू हळू या खेळाची लोकप्रियता वाढली आणि गावातील सर्वच लोकांना या खेळाने आकृष्ट करून घेतले. जसजशी या खेळाची लोकप्रियता वाढत गेली, तसतशी लोकांचे मद्यपानाचे आणि जुगाराचे व्यसन आपोआप कमी होत गेले.