‘व्हॅलेंटाइन’मुळे बाजारपेठा ‘गुलाबी’ ; कोरोना काळानंतर पुन्हा निर्यातीला सुरुवात, उत्पादनही वाढले

कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे गुलाबाच्या निर्यातीला ब्रेक लागलेला मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पुन्हा बाजारपेठा 'गुलाबी झाल्या आहेत. यंदाची मागणी कमी झालेली असली तरी ती सुरू झाली याचाच उत्पादकांमध्ये आनंद आहे. जपान, हॉलंड, नेदरलँड याबरोबरच दुबई व युरोपातही भारतातून गुलाबाची निर्यात होत आहे.

    पुणे : कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे गुलाबाच्या निर्यातीला ब्रेक लागलेला मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पुन्हा बाजारपेठा ‘गुलाबी झाल्या आहेत. यंदाची मागणी कमी झालेली असली तरी ती सुरू झाली याचाच उत्पादकांमध्ये आनंद आहे. जपान, हॉलंड, नेदरलँड याबरोबरच दुबई व युरोपातही भारतातून गुलाबाची निर्यात होत आहे.

    व्हॅलेंटाइन डे जवळ आला की, गुलाबानी बाजारपेठा बहरून येतात. यंदाच व्हॅलेंटाइन मात्र मागील वर्षाच्या तुलनेत वेगळा आहे. निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबाची बाजारपेठ सध्या रुक्ष व कोरडी आहे. देशी गुलाबाची काडी लांबसडक नसते, त्यामुळे सुगंध असूनही त्याला परदेशात मागणी कमी असते. त्यामुळे गंध नसला तरीही भारतातून परदेशात जाणारा गुलाब परदेशी वाणाचाच आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला लाल रंगाच्या गुलाबाला सर्वाधिक मागणी आहे. त्यातही ‘ट्रेड सिक्रेट’ असे खास नाव असलेला ‘डच’ वाणाचापण भारतात उत्पादित झालेला गुलाब परदेशात सर्वाधिक खपतो आहे.

    ऑनलाइन मार्केटमुळे फटका

    पूर्वी फुलांच्या दुकानांत जाऊन फुलांचा बुके बनवून घेण्याकडे ग्राहकांचा कल असायचा. आता ऑनलाइन मार्केटमुळे होम डिलव्हरीच्या ऑर्डर्सना फटका बसला आहे. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी पूर्वी जो ग्राहक दुकानांत येऊन बुकिंग करायचा त्यापैकी ३५ टक्के ग्राहक दुरावल्याची खंत विक्रेत्यांच्या बोलण्यात डोकावते. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वर्षोनुवर्ष एकाच दुकानांतून फुलांच्या ऑर्डर्स देणारे आजही येतात. मात्र, त्यांची मागणी कौशल्यपूर्ण अधिक नजाकतीचे फुलांचे बुके हवेत, अशी असते. त्याच्या रेडिमेड डिझाइन्सचे नमुनेही ते घेऊन येतात. या व्यवसायामध्ये आता कुशल कारागिर येत नसल्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नसल्याचे काही विकेत्यांचे म्हणणे आहे.