साप्ताहिक राशी भविष्य २३ ते २९ मे २०२२

  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

  मेष

  मेष : नियोजन करा
  २३ मे रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. वैयक्तिक निर्णय घेताना दगाफटका होणार नाही याची काळजी घ्या. बेसावध राहून कोणतीही गोष्ट करू नका. दिनांक २५, २६ रोजी कारण नसताना एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते, त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे राहील. अंगलट आलेल्या गोष्टींना शांतपणाने हाताळल्यास त्यातून सुटका होईल. या दिवशी कोणत्याही गोष्टीचा रागराग करून चालणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामकाज योग्य पद्धतीने करावे लागेल व्यवसायातील आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारू नका. सध्या फायद्याचाच विचार करून चालणार नाही. आगामी काळासाठी काही तरतूद करावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा नियोजन करा. राजकीय क्षेत्रात स्पष्टवक्तेपणा टाळा. कुटुंबासोबतचे मतभेद दूर ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या.
  शुभ दिनांक : २२ , २३
  महिलांसाठी : मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करून घ्या.

  वृषभ

  वृषभ : जनसंपर्क उत्तम राहील
  शुक्र मेष राशीत दिनांक २३ रोजी प्रवेश करेल. तो तुमच्या व्ययस्थानात असेल. दिनांक २७, २८ रोजीच्या दिवसांत विश्रांती घ्यावीशी वाटेल आणि ती घेणे गरजेचे असेल. आलेला ताण त्यामुळे कमी होईल. चिडचिड करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांवरील वर्चस्व टिकवून ठेवावे लागेल व्यावसायिकदृष्टय़ा गरजेपेक्षा जास्तीचे सुयश पदरात पडलेल्याचा अनुभव येईल. तो टिकवण्याचा प्रयत्न करा. सध्या व्यवहार चांगले होत असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत बचत करणे इष्ट राहील. सामाजिक ठिकाणी जनसंपर्क उत्तम राहील. जुन्या मैत्रीच्या गाठीभेटी पडतील. मुलांच्या दृष्टीने प्रगती होईल. कुटुंबाची मदत मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या.
  शुभ दिनांक : २५, २६
  महिलांसाठी : जबाबदारीने गोष्टी हाताळा.

  मिथुन

  मिथुन : आनंदवार्ता कळेल
  मेष राशीत २३ मे रोजी प्रवेश करणारा शुक्र लाभस्थानात प्रवेश करेल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण शुभदायी ठरेल. आनंदवार्ता कळेल. जीवनात यश, सौख्य, सुबत्ता, संपत्ती मिळवण्यासाठी संधी मिळावी लागते. सध्या हीच संधी मिळणार आहे. या मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर वापर करून घ्या. इथे वेळ घालवण्यात अर्थ राहणार नाही. तेव्हा उद्याची कामे आजच करण्याची तयारी ठेवा. तेव्हा कुठे या संधीचा लाभ होईल. नोकरदार वर्गाला दुहेरी भूमिका करावी लागेल. खरेदी-विक्री व्यवहारातून मोठय़ा प्रमाणात नफा होईल. दलाली व्यावसायिकांना दिलासा मिळेल. आर्थिकदृष्टय़ा स्थैर्य लाभेल. समाजसेवेची आवड निर्माण होईल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्य साथ देईल.
  शुभ दिनांक : २३, २७
  महिलांसाठी : व्यक्तिमत्त्व खुलेल.

  कर्क

  कर्क : संस्मरणीय कार्य घडेल
  दशमस्थानात २३ मे रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. दिनांक २२, २३, २४ रोजी कटाक्षाने बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जास्त बोलण्याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. त्यातून चांगले काही घडण्याची शक्यता कमी आहे. त्यापेक्षा कमी बोललेले चांगले राहील. वादविवादांपासून लांब राहा. संयम ठेवल्यास कोणत्याही गोष्टीचा त्रास राहणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. नोकरदार वर्गाला आपल्या हातून निसटलेल्या गोष्टी पुन्हा रुळावर येऊ लागतील. छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना उंच शिखर गाठताना घाईने निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक ठिकाणी संस्मरणीय कार्य घडेल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. धार्मिक अनुष्ठान घडेल. आरोग्याची काळजी घ्या.
  शुभ दिनांक : २५, २६
  महिलांसाठी : प्रामाणिकपणे केलेल्या गोष्टीचा शेवट चांगला होईल.

  सिंह

  सिंह : देहबोली सांभाळा
  २३ मे रोजी शुक्र मेष राशीत भाग्यस्थानात प्रवेश करेल. दिनांक २४ रोजी दुपारनंतर, २५, २६ रोजी संपूर्ण दिवस झगडण्याची ताकद कितीही असली तरी हे दिवस चांगले जातील असे नाही. तेव्हा नम्रता हा गुणधर्म अंगी बाणा. संघर्षदायक वृत्ती कमी करा. एखाद्या गोष्टीचे नेतृत्व पडद्याआड करू नका. आपली देहबोली सांभाळा. प्रत्येक प्रश्नातून मार्ग निघेल, पण त्यासाठी धीर धरावा लागेल. हे दिवस सोडले तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.
  नोकरदार वर्गाची कामातील धरसोड वृत्ती कमी होईल. व्यवसायात जाहिरात माध्यमांचा वापर करताना अनावश्यक बाबी टाळा. गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. आर्थिक बाबतीत फायदा राहील. राजकीय क्षेत्रात गतिमान राहाल. नातेवाईकांशी दोन हात लांब राहा. जुन्या व्याधींकडे वेळीच लक्ष द्या.
  शुभ दिनांक : २७, २८
  महिलांसाठी : मानसिकदृष्टय़ा कणखर बना.

  कन्या

  कन्या : आहाराचे पथ्य पाळा
  षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. शुक्र २३ मे रोजी अष्टमस्थानात प्रवेश करेल. द्विधा अवस्थेमुळे तडकाफडकी निर्णय घेऊ नका. एखाद्या गोष्टीचा जाणून-बुजून पाठपुरावा करणे टाळा. वैयक्तिक बाबी इतरांसमोर मांडू नका. परिस्थितीशी मिळते-जुळते घ्या. एक वेळ पारिजातकासारखे कोमल व्हा, वज्राप्रमाणे कठोर होऊ नका.
  नोकरदार वर्गाने कामकाजाबाबत वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. व्यवसायात अनुकूल बदल करण्यासाठी प्रथम नफा-तोटय़ाचे गणित समजून घ्यावे लागेल. उधारीवर खरेदी विक्री टाळा. आर्थिक बाबतीत हलगर्जीपणा करू नका. राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया देणे टाळा. कुटुंबातील निर्णय एकटय़ाने घेऊ नका. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. आहाराचे पथ्य पाळा.
  शुभ दिनांक : २५, २६
  महिलांसाठी : भावनिक गोष्टींच्या नादी लागू नका.

  तूळ

  तूळ : मात करू शकाल
  सप्तम स्थानात शुक्र २३ मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल. दिनांक २५, २६ रोजीचे दिवस महत्त्वाचे निर्णय या दोन दिवसांत घेऊ नका. कोणताही विषय शीघ्रतेने ग्रहण करणे टाळा. अवतीभोवतीच्या गोष्टींचा विचार करा.
  मीपणाची भावना सोडून द्या. स्वत:ला त्रास होणार नाही अशाच गोष्टी करा. नोकरदार वर्गाला हजरजबाबीपणामुळे काही तरी चांगले पदरात पडेल. वकील, बातमीदार, संपादक इत्यादी व्यावसायिकांना अनेक माध्यमांतून विरोध असेल. मात्र त्यावर तुम्ही मात करू शकाल. शब्दांचा अचूक वापर करणे योग्य जमेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे कल राहू द्या. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. मुलांच्या बोलण्या- वागण्याकडे वेळीच लक्ष द्या. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. मानसिक ताण कमी करा. प्रकृतीची काळजी घ्या.
  शुभ दिनांक : २३, २७
  महिलांसाठी : कष्टाळू वृत्ती राहील.

  वृश्‍चिक

  वृश्चिक : जबाबदारी विसरू नका
  शुक्र षष्ठस्थानात २३ मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल. दिनांक २७, २८ रोजी मनमोकळेपणाने एखादी चर्चा करणे त्रासाचे ठरेल. दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नादात चुकीचे पाऊल उचलू नका. न जमणाऱ्या गोष्टींसाठी धडपड करणे टाळा. जे जमणार नाही ते स्पष्टपणे सांगून रिकामे व्हा. अडकून राहू नका. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदार वर्गाला कामातील त्रुटी सुधाराव्या लागतील.
  व्यवसायात आतापर्यंत चिकाटीने उभे केलेले विश्व असेच कोणाच्याही हाती सोपवू नका. मोठे भांडवल सध्या न गुंतवलेले चांगले. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांना विश्वासात घ्या. कौटुंबिकदृष्टय़ा जबाबदारी विसरू नका. मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे टाळा.
  शुभ दिनांक : २५, २६
  महिलांसाठी : जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

  धनु

  धनू : संधी मिळेल
  पंचमस्थानात शुक्र २३ मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल. सप्ताहातील सर्व दिवस चांगले जातील. ठरवून गोष्टी ठेवण्याची गरज राहणार नाही. गोष्टी आपोआपच घडू लागतील. चांगल्या गोष्टींची संधी मिळेल. स्वतंत्रपणे घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. विनाकारण एखाद्या गोष्टीच्या मागे लागावे लागणार नाही. नोकरदार वर्गाला नवीन गोष्टींचे प्रशिक्षण मिळेल. त्यातून एखादी जबाबदारी पार पाडावी लागेल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती सुधारलेली असेल. त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. उलाढालीचे व्याप हाती घ्याल. आर्थिक बाबतीत शुभ घडामोडी घडतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक होईल. मित्रपरिवाराला मदत कराल. घरगुती वातावरण आनंदी असेल. धार्मिक गोष्टींची आवड नसली तरी इतरांमुळे सहभागी व्हाल. आरोग्य ठणठणीत राहील.
  शुभ दिनांक : २७, २८
  महिलांसाठी : चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वत:पासून करा.

  मकर

  मकर : व्यवहारात अपेक्षित यश
  ग्रहमानाची साथ उत्तम राहणार आहे. सर्व दिवसांचा कालावधी शुभदायक राहील. स्वत:च्या हिमतीवर अनेक गोष्टी साध्य कराल. त्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागणार नाही. एखादे काम करायचे झाल्यास बऱ्याच तांत्रिक अडथळय़ांना सामोरे जावे लागायचे. सध्या हे अडथळे दूर होणारे आहेत. अनुभवांतून घेतलेली समज नेहमी समोर ठेवाल. त्यामुळे मार्गातील अडसर दूर होईल. नोकरदार वर्गाचे प्रभावक्षेत्र वाढते राहील. व्यावसायिकदृष्टय़ा अनेक क्षेत्रांतून आलेले प्रस्ताव स्वीकारा. त्यातून फायदा राहील. केलेल्या व्यवहारातून अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात पदार्पण कराल. भावंडांकडून उत्तम प्रतिसाद राहील. नातेवाईकांशी संवाद घडेल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आरोग्याच्या समस्या मिटतील.
  शुभ दिनांक : २३, २५
  महिलांसाठी : महत्त्वाचे निर्णय घ्याल.

  कुंभ

  कुंभ : नवे तंत्र फलदायी
  पराक्रम स्थानामध्ये शुक्र २३ मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल. चिंतेचे सावट दूर होईल. आखलेले नियोजन केव्हा आणि कसे करायचे याचा सध्या विचार येणार नाही. ठोस भूमिका घेऊन कार्य प्रगतिपथावर न्याल. इतरांना दिलेली आश्वासने पूर्ण होतील. सर्वच बाजूने जम बसण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरदार वर्गाला नियमांचे पालन केल्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. लघुलेखन, फोटोग्राफी, वादक, शिल्पकला, कापड व्यापारी इत्यादी व्यवसायांतील गती वाढेल. नवे तंत्र फलदायी ठरेल. भागीदारी व्यवसायातून लाभ होईल. धनदायक गोष्टींमध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात इतरांना मदतीचा हात पुढे कराल. कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण अनुभवाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य ठणठणीत असेल.
  शुभ दिनांक : २३, २४
  महिलांसाठी : उत्साह टिकवून ठेवाल.

  मीन

  मीन : योग्य मार्ग सुचेल
  धनस्थानात शुक्र मेष राशीत २३ रोजी प्रवेश करेल. दिनांक २७, २८ रोजी ज्या गोष्टीमुळे वातावरण दूषित होईल अशा गोष्टी करू नका, त्याचा परिणाम तुम्हाला स्वत:लाच भोगावा लागेल. यासाठी वाईट गोष्टींपासून लांब राहा. जितके शांततेने घ्याल तेवढे तुमच्यासाठी चांगले राहील. या दोन दिवसांचा कालावधी सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. नोकरदार वर्गाला स्वत:च्या अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद वाटेल. कामाच्या बाबतीत योग्य मार्ग सुचेल. व्यवसायात आवक-जावक उत्तम राहिली तरी व्यवहारात फसगत होणार नाही याची काळजी घ्या. कुठेही घाई करू नका. आर्थिक बाबतीत गुंतवणूकसुद्धा विचारपूर्वक करा. सामाजिक माध्यमांचा वापर नको त्या ठिकाणी करणे टाळा. कुटुंबातील वृद्धांची प्रकृती जपा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
  शुभ दिनांक : २५, २६
  महिलांसाठी : नवी ओळख टाळा.