क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे काय? कसा होतो भावनिक परिणाम, यावर नेमका उपाय

ल्युकेमियाच्या एकूण प्रकरणांपैकी केवळ १५ टक्‍के प्रमाण असलेल्या CML आजारामध्ये बोन मॅरोवर परिणाम होतो. ज्यातून पांढऱ्या पेशींची अनिर्बंध वाढ होऊ लागते.

  क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (CML) हे केवळ एक निदान नसून आयुष्यभर चालणारा प्रवास आहे, ज्यात सक्रीय व्यवस्थापन आणि भावनिक चिकाटी गरजेची आहे. ल्युकेमियाच्या एकूण प्रकरणांपैकी केवळ १५ टक्‍के प्रमाण असलेल्या CML आजारामध्ये बोन मॅरोवर परिणाम होतो. ज्यातून पांढऱ्या पेशींची अनिर्बंध वाढ होऊ लागते. कर्करोगाचे निदान हे सुरुवातीला घाबरवून टाकणारे असले तरीही योग्य पद्धत वापरल्यास CML चे व्यवस्थापन शक्य आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

  डॉ. अभय भावे, एम.डी., FRCPA, एम्पायर सेंटर हेमॅटोलॉजी अँड ऑन्कोलॉजी स्पेशलिटी क्लिनिक, मुंबई यांच्या सांगण्यानुसार, “माझ्या पाहण्यात असे अनेक रुग्ण आले आहेत, जे CML मुळे तीव्र भावनिक उद्वेगातून जात असतात. मात्र जिथे हा आजार नियंत्रणात आणणे अधिक शक्य असते अशा क्रॉनिक टप्प्याचे निदान झालेल्या रुग्णांना आव्हान

  असूनही एक परिपूर्ण आयुष्य जगता येऊ शकते. CMLचे व्यवस्थापन करताना त्यात सक्रीयतेने सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण क्रॉनिक टप्प्यातील CML वर वेळीच उपचार न झाल्यास तो वेगाने बळावू शकतो. आपल्या उपचारांच्या परिणामकारकतेची खातरजमा करण्यासाठी आणि आजार अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी तुमच्या BCR-ABL पातळ्यांवर नियमितपणे देखरेख ठेवणे आणि उपचारांच्या इप्सित लक्ष्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. रुग्णांना क्रॉनिक आजाराबरोबर जगताना सामोऱ्या येणाऱ्या भावनिक आणि मानसिक आव्हानांना हाताळता यावे यासाठी त्यांची मदत करताना समुपदेशनही महत्त्वाची भूमिका बजावते. याखेरीज आपल्या डॉक्टरांशी नवीनतम उपचारपद्धतींविषयी चर्चा केल्यास तुम्हाला आपल्यावरील उपचारांची दिशा समजून घेण्यास मदत होईल आणि अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य जगता येईल.”

  बहुतेकदा CML ला ‘गुड कॅन्सर’ – चांगला कॅन्सर म्हटले जाते कारण तो हाताळता येण्याजोगा आहे, तरीही CML अधिकाधिक गंभीर होत गेला की मात्र तो चांगला रहात नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही रुग्ण औषधांना प्रतिसाद देईनासे होतात किंवा त्यांना असे काही दुष्परिणाम दिसून येतात, ज्यांचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ लागतो. असे असले तरीही, वेळेच केलेला हस्तक्षेप आणि काळजीपूर्वक ठेवलेली देखरेख यामुळे ही आव्हाने टाळण्यास किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच, आपल्याला आरोग्यसेवा पुरविणाऱ्यांशी प्रभावी संवाद साधल्याने या आजाराचे इष्टतम व्यवस्थापन खात्रीने होऊ शकते आणि त्यामुळे उपचारांचा हा प्रवास करताना रुग्णाच्या मनामध्ये आशा आणि आत्मविश्वासाची भावना रुजते.

  वैद्यकीय पैलूंबरोबरच CML च्या भावनिक परिणामाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. CML च्या रुग्णांना प्रारंभिक टप्प्यावर सामोऱ्या येणाऱ्या काही आव्हानांपैकी एक आव्हान म्हणजे सामाजिक स्तरावर कर्करोगाशी जोडलेली शरमेची भावना. समाजाच्या या आजाराकडे पाहण्याच्या नजरेमुळे अनेकांना आपल्या सख्ख्या कुटुंबियांखेरीज इतर कुणाशीही या आजाराच्या निदानाविषयी उघडपणे बोलण्यास संकोच वाटतो. आणि इथेच कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आणि भावनिक चिकाटी या गोष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.प्रियजनांशी मनमोकळा संवाद साधणे आणि गरज वाटेल तेव्हा मानसिक स्वास्थ्यासाठी आधार शोधणे हे CML च्या सर्वांगीण व्यवस्थापनाचे अत्यावश्यक घटक आहेत.

  CML सोबतच्या तुमच्या वाटचालीला आधार देणाऱ्या काही सूचना ज्या तुम्हाला स्वत:हून अंमलात आणता येतील:

  सातत्यपूर्ण देखरेख: 

  उपचारांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी आणि काही बदल झाल्यास ते लगेच ओळखण्यासाठी तुमच्या BCR-ABL पातळीचा सातत्याने मागोवा घ्या. वेळच्यावेळी हस्तक्षेपासाठी आणि आजार बळावण्यास प्रतिबंध करण्यासाठी नियमित देखरेख अत्यंत महत्त्वाची आहे.

  सर्वांगीण दृष्टिकोन:

  मानसिक स्वास्थ्यासाठी आधार, आहारातील तडजोडी आणि नियमित व्यायाम या गोष्टींचा तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये समावेश करत उपचारांमध्ये एक सर्वांगीण दृष्टिकोन जपा. या सर्वांगीण दृष्टिकोनामुळे तुमच्या एकूण स्वास्थ्याला बळकटी मिळेल आणि CML व्यवस्थापनालाही आधार मिळेल.

  मनमोकळा संवाद: 

  आपले डॉक्टर आणि काळजीवाहू व्यक्ती यांच्याशी आपणहून खुला आणि प्रामाणिक संवाद साधा. कोणत्याही प्रकारच्या चिंता, लक्षणे किंवा CML सोबतच्या वाटचालीत तुम्हाला सामोरी येणारी कोणतीही आव्हाने याविषयी बोलते व्हा, जेणेकरून तुम्हाला परिणामकारक मदत आणि व्यवस्थापनाची हमी मिळेल.

  आधारासाठीची नेटवर्क्स: 

  आपले अनुभव इतरांना सांगण्यासाठी, भावनिक आधार मिळविण्यासाठी आणि आपल्या प्रवासात कमी एकटेपणा जाणवावा यासाठी आधारगटांच्या माध्यमातून इतर CML रुग्णांशी स्वत:ला जोडून घ्या.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या आकडेवारीनुसार जगभरात अंदाजे १२ लाख ते १५ लाख लोक CML सोबत जगत आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे उपचारांच्या परिणामांतही लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. CML वरील उपचार, विशेषत: tyrosine kinase inhibitors (TKIs) मुळे खूपच चांगले परिणाम मिळत आहेत आणि रुग्णांच्या जीवनमानाचा दर्जाही सुधारला आहे.

  CML हा अनेकांच्या आयुष्याचा भाग असला तरीही तीच एखाद्या व्यक्तीची ओळख असण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, आपल्या उपचारांमध्ये तुमचा सक्रीय सहभाग आणि भावनिक स्वास्थ्य या दोन गोष्टींची तब्येतीवर अधिक चांगले परिणाम घडवून आणण्याच्या दृष्टीने व जीवनमानाचा दर्जा चांगला राखण्यातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.