सांबार आणि छत्रपती संभाजी महाराज काय आहे कनेक्शन? वाचा कुठून आला शब्द

सांबार शब्दाविषयी अनेक प्रकारचे ऐतिहासिक दाखले दिले जात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच सांबार नेमकं कुठून आलं असावं. सांबार शब्द कसा तयार झाला? सांबार नक्की कोणत्या पदार्थाला म्हटलं जायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.

  सांबार हा काही आता फक्त दाक्षिणात्य पदार्थ राहीलेला नाही. इडली – सांबार भारतातच नाही तर आता जगभरातही खवय्यांची पसंती मिळवत आहे. कारण इडली म्हटलं की पुढचा शब्द सांबार आलाच पाहिजे इतकं हे जणू समीकरण तयार झालं आहे. आमटीइतकंच सांबाराला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे सांबार-भातासारखं जेवणही आपल्या सगळ्यांच्या ताटात येऊन पोहोचलं आहे. पण सांबार शब्दाविषयी अनेक प्रकारचे ऐतिहासिक दाखले दिले जात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच सांबार नेमकं कुठून आलं असावं. सांबार शब्द कसा तयार झाला? सांबार नक्की कोणत्या पदार्थाला म्हटलं जायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.

  याचं पदार्थाचा म्हणजेच सांबराचा संभाजी महाराजांच्या नावाशी संबध लावला जातो. त्यामुळे यावरही वेगळीच चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. पण खरचं संभाजी राजे आणि सांबराचा काही संबंध आहे का? अनेकदा  एखादा प्रचलित पदार्थ आपल्या रोजच्या आयुष्यात इतका मिसळून जातो की त्याची मूळकथा शोधायला गेलं तर बराच मोठा इतिहास हाताशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे अनेकवेळा आपल्या समजुतींना धक्का लागण्याचीही शक्यता असते. तसेच अनेकदा एखाद्या गोष्टीची पाळमुळं ही भलतीच सुद्धा निघतात.

  अर्थ शोधायला गेल्यास सांबार या शब्दाचे अनेक अर्थ सापडतात. आज आपण ज्या आमटीला किंवा साराला  सांबार म्हणतो त्याचा मूळ अर्थ तोंडीलावणं असा आहे. आजचं सांबार हे प्राचीन काळी जेवणात वापरलेल्या सांबार नामक विविध पदार्थांशी थेट नातं नाही असं दिसून येतं.

  का लावला जातो संभाजी आणि सांबार शब्दाचा संबंध

  बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, सांबार नक्की कुठे तयार झालं किंवा हा आज खाल्ला जाणारा पदार्थ पहिल्यांदा कुठे तयार झाला असा प्रश्न विचारला की एक रुळलेली कथा सांगितली जाते ती म्हणजे. तंजावरच्या मराठा राजघराण्याच्या स्वयंपाकघरात घडलेल्या एका अपघाताची. ती कहाणी सर्वप्रथम पाहाणं गरजेचं आहे.

  छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी) तंजावरचं राज्य सांभाळत होते. त्यांचे निधन 1683 साली झाले. 1684 साली व्यंकोजी यांचे पुत्र शाहुजी पहिले त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षी सत्तेवर आले. तंजावरच्या इतर राजांप्रमाणे लेखन, काव्य, कला यांमध्ये त्यांना भरपूर रस होता. ते उत्तम स्वयंपाकी होते असंही सांगितलं जातं.

  सांबाराच्या प्रसिद्ध कथेनुसार एके दिवशी छत्रपती संभाजी महाराज तंजावरला गेले होते. मात्र शाहुजी महाराजांच्या मुदपाकखान्यात त्यादिवशी आमटीमध्ये घालायला कोकमं नव्हती. तेव्हा कुणीतरी त्यांना कोकमाऐवजी चिंच घालून पाहू असं सुचवलं आणि त्याप्रमाणे चिंच घातलेली आमटी तयार करण्यात आली.

  संभाजी महाराजांचा आदर करण्यासाठी त्याला संभाजी+आहार (संभाजी महाराजांचा आहार) अशा अर्थाने सांभार असं नाव देण्यात आलं. हीच आमटी पुढे सर्वत्र वेगवेगळ्या घटकांसह बदलत बदलत दक्षिण भारत मग भारतभर पसरली आणि सांबार नावाने आज प्यायली जाते. अशी सांबाराच्या जन्माची साधारण गोष्ट सांगितली जाते.

  दक्षिण भारतातले ख्यातनाम अन्न-इतिहासकार आणि आहारतज्ज्ञ के. टी. आचार्य यांनीही या कुळकथेला दुजोरा दिला होता. त्यामुळे सांबार पदार्थ तिथूनच तयार झाला असावा अशी सर्वमान्य समजूत आहे.

  पुण्यामध्ये राहाणारे खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. चिन्मय दामले यांना या घटनेमधील तपशीलात तथ्य वाटत नाही. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “1684 साली शाहुजी राजगादीवर आले तेव्हा ते 12 वर्षांचे होते. तर छ. संभाजी महाराजांची कारकीर्द 1680-1689 अशी आहे. त्यामुळे 1684-89 या कालावधीत हा प्रसंग घडणं थोडं अशक्य वाटतं.”

  त्याचप्रमाणे छ. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत ते तंजावरला गेल्याचे तसंच अशी सांबार बनवण्याची घटना घडल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. 17 व्या शतकातील मराठ्यांच्या आहारातील पदार्थांचे फारच कमी संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे या कथेला फारसा आधार मिळत नाही.

  मात्र तंजावरचे सध्याचे वंशज शिवाजी महाराज भोसले यांनी संभाजी महाराज तंजावरला आलेले असताना डाळीच्या पाण्यात, भाज्या, चिंच वापरुन आमटी करण्यात आली म्हणून संभाजी महाराजांच्या नावाने सांबार तयार झालं असं त्यांनी सांगितलं.