हिवाळ्यात का होतात सर्वाधिक आत्महत्या?; तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ कारण….

    गुलाबी थंडीचा हिवाळा ऋतू हा बहुतेकांना हवाहवासा वाटतो. परंतु या हिवाळ्यात माणसांच्या शाररिक आणि मानसिक स्वास्थासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश मात्र पुरेसा मिळत नाही. त्यामुळे आधीपासूनच खचलेल्या व्यक्तींचे डिप्रेशन अधिक वाढते. त्यामुळे हिवाळ्यात सर्वाधिक आत्महत्या होतात असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    ‘हिवाळ्यात नैराश्य म्हणजे डिप्रेशन वाढण्याचं कारण थेट हवामानाशी संबंधित आहे. उदासीनता वाढण्याचे पहिलं कारण म्हणजे हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची वेळ कमी होते, त्यामुळे मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनच्या स्रावावर परिणाम होतो. हा मूड आनंदी करणारा हार्मोन आहे, याला हॅपी हॉर्मोन असेही म्हणतात. हा हॉर्मोन मेंदूसाठी न्यूरोट्रांसमीटर म्हणून देखील कार्य करतो आणि थेट मूडवर परिणाम करतो. या हार्मोनची पातळी कमी झाल्याने मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि डिप्रेशन वाढतं. याला हंगामी प्रभावात्मक विकार देखील म्हणतात.

    दुसरं कारण म्हणजे थंडी हे आपल्या शरीरासाठी तणावाप्रमाणे असते. थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीर स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतं. यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्सची गरज भासते आणि जेव्हा शरीर मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स वापरतं तेव्हा कॉर्टिसोलचे उत्सर्जन वाढतं. कार्टिसोल हा एक निगेटिव हार्मोन आहे, यामुळे नैराश्य वाढते. यामुळे जेव्हा हिवाळ्यात शरीराच्या आत कोर्टिसोलचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा मोठ्या संख्येने लोक दुःखी असतात, नैराश्याच्या आहारी जाऊ लागतात.

    डिप्रेशनची लक्षणे :

    • उदास वाटणे, काहीही न समजणे आणि कोणत्याही कामात मन न लागणे.
    • तुमचं आवडतं काम करण्याचीही इच्छा नसणे.
    • कायम थकवा जाणवणे, कंटाळा येणे.
    • खूप झोप येणे, नेहमी झोपण्याची इच्छा असणे.
    • वारंवार क्रेविंग होणे आणि त्यामुळे वजन वाढणे.
    • कोणत्याही कामात लक्ष नसणे.
    • आत्मविश्वासाचा अभाव आणि प्रत्येक चुकीसाठी दोषी वाटणे.
    • जगण्याची इच्छाशक्ती कमी होऊन मनात आत्महत्येचे विचार येतात

    डिप्रेशन टाळण्यासाठी काय करावं?

    • सूर्यप्रकाशात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
    • झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
    • नकारात्मक विचार टाळण्यासाठी ध्यान करा.
    • योगा क्लास किंवा डान्स क्लासमध्ये जा.
    • आपल्या छंदांकडे लक्ष द्या.
    • आठवड्यातून किमान एकदा कोणत्याही मोकळ्या ठिकाणी फिरायला जा.
    • नकारात्मक विचार आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहा.
    • गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांना भेट देण्याची खात्री करा.
    • कारण या परिस्थितीत हार्मोनल स्राव संतुलित करण्यासाठी अनेकदा औषधे किंवा उपचारांची गरज असते.

    डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. नवराष्ट्र माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.