दिवाळीला किल्ला का बनवतात? जाणून घ्या कारण

दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी आपल्यातली ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात.

    दिवाळी २०२३ : दिवाळीच्या तयारीची सुरुवात झाली आहे. दिवाळीची खरेदी करावी तेवढी कमीच. संपूर्ण देशामध्ये दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सगळीकडे सुरू होते. एकीकडे घराघरात आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लहान मुलांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये लहान मुलांच्या परीक्षा संपल्या की लगेच त्यादिवसापासूनच किल्ला कसा बनवायचा? गेल्या वर्षी बनवलेल्या किल्ल्यापेक्षा या किल्ल्यामध्ये नवीन काय बनवता येईल याचे विचार डोक्यामध्ये सुरु असतात. महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यांचा फार मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर त्या किल्ल्यानां आपल्या पुवर्जांच्या भव्य पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामधल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, विजय- पराजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे गडकिल्ले साक्षीदार आहेत.

    दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी आपल्यातली ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात, “पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते किल्ला बघून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत असत. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात लहान मुलांना सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत.

    “किल्ल्याची प्रतिकृती तयार केल्यामुळे लहान मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. किल्ला हे शौर्याचे आणि ध्येयाचं प्रतिक मानलं जातं .दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होतं. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही यामुळे मिळत असे. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि प्रत्येक दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले.”