प्रसुतीपूर्वच नाही तर नंतरही महिलांनी घेतली पाहिजे आरोग्याची विशेष काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्रसूतीनंतर पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. प्रसुतीनंतर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले असता, आणि बाळाला स्तनपान करणे , घर सांभाळणे आणि रात्रभर जागे राहणे यामुळे थकवा जाणवू शकतो.

    पुणे – केवळ प्रसूतीपूर्वीच नाही तर प्रसूतीनंतरही गर्भवतीं महिलांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे २-३ महिने आई आणि बाळ दोघांसाठीही महत्त्वाचे असतात कारण या कालावधीत त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या टप्प्यात आई आणि बाळाचे नातेसंबंध घट्ट होते, आई बाळाला स्तनपान करते आणि डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जावे लागते. शिवाय, शारीरिक आणि भावनिक आव्हानांमुळे प्रसूतीनंतरची काळजी ही 7 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यत वाढवली जाऊ शकते. प्रसूतीनंतरच्या तज्ञांचे लक्ष्य आई आणि तिच्या बाळाचे आरोग्य कसे सुधारता येईल याकडे असते.

    गर्भधारणा हा खरंच एक आनंददायी अनुभव असतो पण प्रसूतीनंतरच्या कालावधीत अनेक महिला गोंधळून जातात. प्रसूतीदरम्यान किंवा नंतर गुंतागुंत अनुभवताना आई आणि बाळाची योग्य काळजी घेणे गरजेचे ठरते. बद्धकोष्ठता, कावीळ, संक्रमण, मूत्रमार्गासंबंधीत समस्या आणि प्रसूतीनंतरचे नैराश्य अशा समस्या आईच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम करू शकतात, म्हणून नवीन मातांनी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतरची काळजी म्हणजे केवळ नियमित तपासण्या, फॉलोअप आणि स्क्रीनिंगसाठी जाणे असा नाही तर त्याचबरोबरच पौष्टिक आहार, व्यायाम, योग आणि ध्यान यासारख्या तणाव-कमी करणाऱ्या क्रिया तसेच संतुलित जीवनशैलीचे पालन करणे तसेच पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे असेही डॉ. मधुलिका सिंग(वरीष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रेन) यांनी स्पष्ट केले.

    प्रसूतीनंतरचा कालावधी म्हणजे नवीन आईला स्वतःची आणि बाळाची अत्यंत काळजी घ्यावी लागते. नवजात मातांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रसूतीनंतरची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही बाजूंनी काळजी घेणे गरजेचे आहे. नवमातांना स्तनासंबंधी वेदना, वजन कमी होणे, रक्ताच्या गुठळ्या आणि लघवीच्या समस्या येऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मात्र अशा वेळी घाबरुन न जाता तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रवास सुखकर करु शकता असे डॉ नितीन गुप्ते(स्त्रीरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा पुणे) यांनी स्पष्ट केले.

    प्रसूतीनंतर पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. प्रसुतीनंतर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले असता, आणि बाळाला स्तनपान करणे , घर सांभाळणे आणि रात्रभर जागे राहणे यामुळे थकवा जाणवू शकतो. म्हणून, जेव्हा बाळ झोपलेले असेल तेव्हा तुम्ही थोडी झोप घेण्याचा प्रयत्न करा. पुरेशी विश्रांती तुमच्या शरीराला झीज भरुन काढण्यास मदत करते. या महत्त्वाच्या काळात तुमच्या कुटुंबियांकडून किंवा मित्रांकडून मदत घेण्यास अजिबात संकोच बाळगु नका. तुम्हाला तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागेल. तज्ञांच्या शिफारशीनुसार तृणधान्य, भाज्या, फळे आणि प्रथिनांचे सेवन करा आणि भरपुर पाणी प्या आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा. जंक फुड, तेलकट पदार्थ, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच चालणे किंवा योगासनासारखा हलक्या व्यायामाला सुरुवात करा. मेडिटेशन सारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा आणि तणावमुक्त रहा अशी प्रतिक्रिया डॉ. मधुलिका सिंग(वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रेन) यांनी व्यक्त केली.

    प्रसूती नंतर लगेचच जड वस्तू उचलणे टाळा कारण यामुळे तुमच्या ओटीपोटातील टाक्यांवर ताण येऊ शकतो. फायबर युक्त आहाराचे सेवन करणे, हायड्रेटेड आणि तणावमुक्त राहणे, स्तनपानाचा योग्य वेळापत्रकाचे पालन करणे, घरी पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवणे आणि स्वतःच्या आणि बाळाच्या बाबतीत चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हिरव्या भाज्या, हंगामी फळे, सॅलड्स, दुधाचे पदार्थ, डाळी यांचा आहारात समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्या असेही डॉ. गुप्ते यांनी स्पष्ट केले.