तुमच्या नखांचा रंग बदलतो आहे? मग ‘हे’ नक्की वाचा 

  नखांचा रंग (nails are change) आणि त्यात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नखांवर (nails) डाग पडणे किंवा इतर काही होणे हे कदाचित एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.जेव्हा असे होते तेव्हा त्वचारोगतज्ज्ञाला दाखविण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून रक्ताची तपासणी करून आणि इतर प्रकारे डॉक्टर त्यांच्या रुग्णांची परिस्थिती समजून घेऊ शकतात. स्थिती गंभीर आहे असे जाणवले तर विशेषज्ञ बायोप्सी करण्यास सांगू शकतात.

   

  नखांमध्ये(nails) बदल झाला तर ही आरोग्याची गंभीर समस्या असतेच असे नाही. काही वेळा हा बदल सामान्यही असू शकतो. त्वचारोगतज्ज्ञ वलेरिया जॅनेला फ्रेंझन म्हणतात, “पायांच्या नखांची निगा कमी राखली जाते, आणि अनेकदा त्यात जास्त समस्या असतात. उदाहरणार्थ- ही नखं पिवळी पडू लागतात आणि जाड होऊ लागतात.

  पांढरी नखं (white nail)

  नखांमध्ये काही असामान्य बदल होत आहे, असे वाटले तर सर्वात आधी त्यांच्या रंगावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. नखांचा रंग पांढरा आहे, असे वाटले तर हे मायकॉसिस, सोरायसिस, न्यूमोनिया किंवा हृदयाविकाराचेही लक्षण असू शकते. पोषक घटकांची कमतरता, आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी असणे यामुळेही ही स्थिती उद्भवू शकते. यात नखांवर पांढऱ्या रंगाचे चट्टे पडू लागतात. पण त्यामुळे कसल्याही प्रकारचे नुकसान होत नाही आणि शरीरात बदल झाल्याचेही हे लक्षण नसते. जर तुमच्या नखांचा रंग पांढरा होऊ लागला आहे तर त्वचारोगतज्ज्ञांकडे जावे आणि त्यांनी वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितली तर ती अवश्य करावी, जेणेकरून पुढे एखाद्या विशेषज्ञाची गरज लागली तर त्यांना संपर्क केला जाऊ शकतो.

  पिवळी नखे (yellow nail)

  नखे पिवळी होणे अनुवांशिकसुद्धा असू शकते किंवा वाढत्या वयानुसार नखे पिवळी होऊ शकतात. अशा वेळी नखे जाड दिसू लागतात आणि त्यांचा पिवळेपणाही जाणवण्याइतका असतो. फंगल इन्फेक्शनमुळेही असे होऊ शकते. त्याचप्रमाणे काही गंभीर प्रकरणांमध्ये हे सोरायसिस, एचआयव्ही आणि मूत्रपिंडांच्या आजाराची लक्षण असू शकते. ज्या व्यक्ती जास्त धूम्रपान करतात त्यांच्या नखांचा सिगरेटशी थेट संपर्क आल्याने ती पिवळी दिसू लागतात. अशा प्रकरणांमध्ये अंगठा आणि तर्जनीच्या नखांचा रंग अधिक पिवळा दिसतो.

  नखांवर पांढरे डाग (stain white nail)

  त्वचारोगतज्ज्ञ याला पिटिंग असेही म्हणतात. नखांवर हे छोट्या छोट्या ठिपक्यांसारखे दिसतात. हे ठिपके बहुधा एकाच नखावर दिसतात. या ठिपक्यांचा संबंध एटॉपिक डर्माटायटिस (एक प्रकारचा एक्झिमा), सोरायसिस किंवा एखादा त्वचाविकार किंवा केसांच्या समस्येशी असू शकतो. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाओलोमधील त्वचाविकारतज्ज्ञ ज्युलियाना टोमा म्हणतात, “जर नखांवर ठळक पांढरे डाग स्पष्टपणे दिसत असतील तर त्याचा संबंध अॅलेपेशिया एरियाटा (अचानक केसगळती) या विकाराशी असू शकतो. अशा वेळी तुम्हाला केसांच्या समस्येवर उपचार करून घेतले पाहिजेत. क्वचित काही वेळा हे सिफलिस नावाच्या एका लैंगिक संसर्गाचेही लक्षण असू शकते.

  निळ्या रंगाची नखे (bule nail)

  हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. एखाद्या विशिष्ट औषधामुळे नखांचा रंग निळा होऊ शकतो. मुरुम किंवा मलेरियाच्या औषधांचा वापर करणाऱ्या लोकांच्या नखांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात. असे झाल्यास, एखादे विशिष्ट औषध थांबवावे का किंवा उपचार बदलण्याची आवश्यकता आहे का, याचा विचार डॉक्टरांनी करणे आवश्यक आहे.

  नखांवर रेषा दिसणे (line)

  त्यांना ‘ब्योज लाइन्स’ असेही म्हणतात. नखांवर आडव्या रेषांसारख्या या रेषा दिसतात. खूप ताप आल्यानंतर घेतलेली औषधे किंवा केमोथेरपीनंतर अशा प्रकारच्या रेषा दिसतात. या रेषा गडद रंगाच्या असतात किंवा एकाच बोटावर दिसून येतात तेव्हा हे मेलानोमाचे लक्षण असू शकते. मेलानोमा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे.

  नखांना वारंवार फंगल इन्फेक्शन होणे (Fungal infection)

  मायकोसिस फंगल इन्फेक्शनमुळे होतो आणि उपचार थांबवले तर तो पुन्हा होतो. यावर नीट लक्ष ठेवले नाही तर तो वारंवार होतो. पायांच्या नखांवर बहुधा हा प्रकार होतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, उपचार सुरू केल्यानंतर तो किमान सहा महिने तरी नियमित घेतला पाहिजे. हातावर फंगल इन्फेक्शन झाले तर तीन-चार महिने उपचार घेतले पाहिजेत. रुग्णाने वेळेवर औषधे घेतली पाहिजेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढची पावले उचलली पाहिजेत. त्याचप्रमाणे घट्ट बुट, स्विमिंग पूल किंवा सोना बाथ अशा संसर्ग करू शकणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.