पु.ल. देशपांडे – एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व

पु.ल. देशपांडे हे केवळ लेखक नव्हते ते शिक्षक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक,वक्ते होते. पुलंनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्वच क्षेत्रात काम केले.

  पूर्णश्री जाखडी

  पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई. पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबई मध्ये झाला. पु.ल. म्हणजे एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व. पुलंची ओळख एका वाक्यात करून देणं केवळ अशक्य. लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकेत त्यांचे व्यक्तिमत्त्व सामावलेले आहे. पु.ल. या नावाची जादू ज्येष्ठांपासून ते आजच्या तरुणांपर्यंत कायम आहे.

  पु.लं.चे साहित्य आणि त्या साहित्याचे आजच्या परिपेक्षातील संदर्भ असा अनेकदा चर्चेचा विषय होतो. ‘पु.ल. वाचण्याचे देखील एक वय असते’ अस विधान कधी कधी ऐकायला मिळत. परंतु असं विधान करणाऱ्यांना पु.ल. काय आहेत? त्यांचं व्यक्तिमत्त्व काय होते? हे कळलेच नाही हेच खरे. पु.लं.च्या लेखनात एवढी ताकद होती की, आणीबाणीच्या काळात आणि आणीबाणी नंतरच्या काळात पु.लं.नी जे लेखन केले ते आजच्या काळालाही लागू होते.

  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वयात, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी पु.ल. महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या महामारीत सुद्धा मानसिक संतुलन राखण्यासाठी पुलंच्या साहित्याची, त्यांची निर्मिती असलेले विविध नाट्य, चित्रपटांचा आधार घेतला जातो. आजच्या काळातसुद्धा पुलं चे विनोद मनाला उभारी देतात. पुलं चे विनोद हे खळखळून हसविण्यासोबतच आत्मपरीक्षण सुद्धा करायला भाग पाडतात. पुलं नी लेखनातून केवळ मनोरंजन असा एक दृष्टिकोन कधीच ठेवला नाही. त्यातून पुलंनी नेहमीच एक विचार मांडला. ‘गुळाचा गणपती’ या पुलंच्या गाजलेल्या चित्रपटातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.

  पु.ल. देशपांडे हे केवळ लेखक नव्हते ते शिक्षक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक,वक्ते होते. पुलंनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्वच क्षेत्रात काम केले. पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. पुल हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्यसुमने आणि विनोदी किस्से आहेत. दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची मुलाखत घेणारे पुलंच होते.

  साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार मिळणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी पुल एक होते. मुंबईच्या ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेत पुलंनी अनेक अविस्मरणीय प्रयोग केले. संशोधकांना आधारभुत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख अस बरेच साहित्य पुलं नी जमा करून ठेवले आहे. पुलंनी मराठी नाटकांचा सुरुवातीपासूनचा इतिहास खूप प्रयत्नांनी जमा केला की, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतातील कलांचा इतिहास शोधण्यास सुरुवात केली. पुलं हे भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या समाजातील लोकांमध्ये सहज मिसळून जात.

  पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर यांनी ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ असा मराठी चित्रपट काढला. पुलंच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके, चित्रपट झाले. १९३८ पासून पुलंच्या नभोवाणीशी संबंध आला. १९५५ ल पु.ल. देशपांडे आकाशवाणी नोकरीला लागले १९५६-१९५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माते झाले. बदलीमुळे दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ‘गडकरी दर्शन’ नावाचा कार्यक्रम सादर केला आणि त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ चा जन्म झाला.

  पुलंनी मनोरंजन तर केलंच पण त्यांनी आपल्याला प्रेम करायला सुद्धा शिकवलं. पुलं हे लोकांच्या वागण्यातील विसंगती, हास्यास्पद गोष्टी हेरून पुल त्या लोकांच्या नकला करायचे.  घरी कोणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे त्यांच्या आईला वाटायचे. आजही पुलं प्रत्येकाच्या मनात त्यांच्या लेखनातून, गाण्यांतून, विनोदातून, नाटकातून, चित्रपटातून जिवंत आहेत. पुलंनी दिलेल्या या अनमोल साहित्याचा ठेवा जपून ठेवणं खूप गरजेचे आहे. कारण ‘पु.ल. देशपांडे’ असं व्यक्तिमत्त्व पुन्हा कधीच होणे नाही.