२०२० मध्ये ‘या’ दहा घटना ठरल्या लक्षवेधक

२०२० हे वर्ष सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे कोरोनामुळे, परंतु कोरोना शिवयसुद्धा देशात किंवा जगात अशा अनेक घटना घडल्या ज्याने आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर आपली छाप सोडली.

२०२० ( 2020) हे वर्ष संपायला अगदी काहीच दवस शिल्लक राहिले आहे. या वर्षभरात देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक घटना घडल्या ( incidents became remarkable). मावळत्या वर्षाला (good bye 2020) निरोप देताना या घटनांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

 

१) कोरोनाचे आगमन
९ फेब्रुवारीला दिल्ली विमानतळावर भारतातला पहिला कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर अगदी दोन तीन महिन्यातच कोरोनाने दिल्ली मुंबईसह संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्याला आपल्या विळख्यात घेतले. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले.  एक कोटींच्या जवळ संपूर्ण देशात रुग्ण आढळे असून १४ लक्षांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप देश कोरोनाच्या प्रभावी लसीच्या प्रतीक्षेत आहे.

२) राम मंदिराचे भूमिपूजन 

अयोध्याच्या विवादित जमिनीचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ लागला. या जमिनीवर राम मंदिर बांधण्याच्या पक्षात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरु असून २०२३ पर्यंत मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे.

३) भारत-चीन सीमावाद

संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यात ढकलणाऱ्या चीन ने भारताच्या लद्दाख जवळील भागात घुसखोरी केली आणि पेनगॉन लेक भागावर स्वतःचा हक्क सांगितला. चीनने या भागात मोठ्याप्रमाणात सैन्य पाचारण केले आणि भारतावर दबाव  बनविण्याचा प्रयत्न केला. परिणामी भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढत गेला. वर्षाच्या अखेरीसही भारत-चीन सीमावादावर तोडगा निघाला नसून दोनही देश युद्धाच्या उंबरठयावर उभे आहे.

४) हाथरस येथील सामूहिक बलात्कार 

हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला ढवळून निघाला होता. बलात्कार पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीतच पीडितेवर अंत्यसंस्कार केले. हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर याला राजकीय रंगही मिळाला. पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की झाली. उत्तर प्रदेश सरकारने माध्यमांनाही गावाच्या वेशीबाहेरच ठेवले. अत्यंत संशयास्पद कारवाईमुळे योगी सरकारचीही नाचक्की झाली.

५) कानपुर एन्काउंटर 

कानपुर जवळील बिकरू येथे कारवाई करायला आलेल्या पोलिसांच्या तुकडीवर हिस्ट्री शिटर विकास दुबे याच्या टोळीने भर वस्तीत गोळीबार केला. ३ जुलै २०२० रोजी घडलेल्या या घटनेत ८ पोलीस शाहिद झाले होते. या घटनेनंतर कुख्यात गुंड विकास दुबे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला उजैन येथून अटक केली.  दरम्यान ९ जुलै रोजी ज्या गाडीत विकास दुबे बसला होता तिला अपघात झाला आणि विकास दुबेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला.

६) एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला पेटविले

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकू जाळ्याची धक्कादायक घटना ३ फेब्रुवारी २०२० रोजी घडली. यामध्ये ती ४० टक्के भाजली गेली होती मात्र चेहरा पूर्णपणे भाजला  होता. उपचारादरम्यान या तरुणीचा १० फेब्रुवारी २०२० ला  मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी निकेश नगराळे याला अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.

७) निसर्ग चक्रीवादळ

३ जून रोजी अलिबाग किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने यावर्षी सर्वाधिक नुकसान केले. एकीकडे देश कोरोनाशी लढत असताना या नैसर्गिक संकटामुळे देशासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. विशेषतः मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवर याचा मोठा तडाखा बसला. या आपदेत अनेकांनी आपला जीव गमावला तर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

८) अमेरिका निवडणूक 

आर्थिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेची निवडणूक यावर्षी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय होती. जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, अमेरिकेच्या नागरिकांनी जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले.

९) राफेल हवाई दलात दाखल

हवाई दलाची ताकद वाढविणारे ३ राफेल लढाऊ विमान या ४ नोव्हेंबरला भारतात दाखल झाले. अत्याधुनिक यंत्रणा आणि असामान्य मारक शक्तीसाठी ओळखले जाणारे हे फायटर जेट भारताने खरेदी केल्यानंतर संपूर्ण देशाच्या भुवया उंचावल्या होत्या.

१०) शेतकरी आंदोलन 

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या शेती विधेयकामुळे शेतकरी रत्यावर उतरले आहेत. देशातले आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आंदोलन ठरत असून नवीन शेती विधेयक मागे घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे. पंजाब आणि हरियाणा येथील मोठ्याप्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.