प्रत्येकाचे प्राण वाचविणे हीच आमची प्राथमिकता : आयुक्त मुंढे

कोरोना योद्धांना सहकार्य करा

  • नियमांचे पालन करा

नागपूर.  कोविडला आळा घालण्यासाठी मनपाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना काही नागरिकांना डोकेदुखी वाटत आहे. मात्र, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःसह आपल्या परिवाराचा आणि शहरवासीयांचा जीव वाचविण्यासाठी नियमाने अनुसरूनच वागावे. तरच आपण कोरोनाला हरवू शकू, असे मत नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी केले. कोरोनाची शहरातील स्थिती, त्यावरील उपाययोजनांचा आढावा आणि नागरिकांचे कर्तव्य या सर्व विषयांना अनुसरून त्यांनी दुपारी नागरिकांशी फेसबूकवरून संवाद साधला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काही व्यापारी आणि दुकानदार कोरोना चाचणी करायला नकार देत आहे. व्यवसायाची वेळ वाढवून देण्याची मागणी करत आहे; परंतु दुकानात विनामास्क येणाऱ्या ग्राहकांना कुणी बंदी का घालत नाही, असा प्रश्नही आयुक्तांनी विचारला. शासनाच्या पाहणीनुसार शहरातील ८५  ते ९० टक्के दुकानदार कोरोना संशयित असू शकतात. त्यांनी कोरोनाची चाचणी केली तर त्याचा प्रादुर्भाव टाळता येंऊ शकतो. कोरोनाचे वाहक बनून दुसऱ्यांच्या मृत्यूचे कारण ठरू नका, असे मत आयुक्तांनी नोंदविले.

पाहिजे तितके बेड आणि उत्तम टेस्टिंग सुविधा उपलब्ध 
कोरोना उपचारासाठी मनपा प्रशासनाकडे पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत, असा जाणीवपूर्वक गैरप्रचार काही घटकांडून केला जात आहे. अशा अपप्रचाराला बळी पडू नये. शहरात आरोग्य विभागामार्फत १ लाख पेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता ५ हजार अतिरिक्त बेड्स उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापैकी ३०० बेड्स पेशंटला देण्यात आले असून नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात ३४ ठिकाणांवर ‘कोरोना टेस्टिंग सेंटर’ उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी ‘ई-संजीवनी ओपीडी अँप’ डाउनलोड केल्यास त्यावर डाॅक्टरांची अपाॅईनमेंट भेटू शकते. एखाद्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याने कोव्हिड केअर सेंटरशी संपर्क साधावा. कोरोनापासून स्वतःला वाचवायचे असल्यास जीवनमान बदलण्याची, तंबाखू-खर्रा यांचे व्यसन टाळण्याचाही सल्ला आयुक्तांनी दिला. कोरोनाची लक्षणे नसणाऱ्यांनी थेट हाॅस्पिटलमध्ये न जाता कोविड केअर सेंटरशी संपर्क साधावा. मल्टिपल टेस्ट करू नये. कोरोनासाठी उपचार हवे असल्यास रुग्णांना त्यांचा मर्जीप्रमाणे रुग्णालय दिले जाणार नाही किंवा तसा अट्टाहासही करू नये, असेही आयुक्त मुंढे म्हणाले.

 माझ्या स्टाफने सुट्टीच घेतलेली नाही – आयुक्त मुंढे 
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी माझा स्टाफ दिवसरात्र झटत आहे. त्यांनी मागील ३ महिन्यांपासून सुट्टीही घेतलेली नाही. कोणताही सण असो वा कितीही पाऊस असो ते रुग्णांसाठी अविरत सेवा देत आहेत. नागरिकांनी त्यांच्या या सेवाभावाची तरी जाणीव ठेवावी. कोरोनाला रोखण्यासाठी स्वतःच्या सवयी बदला, व्यसने टाळा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा; मात्र हे सर्व करत असताना कोरोना झालेल्या रुग्णाला किंवा त्याच्या परिवाराला वाळीत टाकू नका, अशी विनंतीही मुंढे यांनी केली. यासह त्यांनी नागरिकांच्या शंका-कुशंकांनाही उत्तरे दिली.