गेल्या ६ दिवसांमध्ये एस.टी.ने १ लाख ६ हजार २४ मजुरांना राज्यांच्या सीमेपर्यंत सोडले – परब

मुंबई: एसटीच्या लालपरीने गेल्या सहा दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल १ लाख ६ हजार २४ मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यासाठी

 मुंबई: एसटीच्या लालपरीने गेल्या सहा दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल १ लाख ६ हजार २४ मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यासाठी एसटीच्या हजारो बहाद्दर चालकांनी अहोरात्र मेहनत करून ७२२७ बसेसद्वारे ही बहुमोल कामगिरी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अर्थात, या बहाद्दर चालकांना एसटीच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांबरोबर राज्य परिवहन विभागाचे देखील बहुमोल सहकार्य लाभले आहे. यासाठी निश्चितच हे सर्व जण कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी काढले आहेत.

गेली ७२ वर्ष राज्याच्या सर्व सामान्य जनतेला सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा  देणाऱ्या एसटीने वेळोवेळी आपले सामाजिक भान जपत , संकटात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. आज करोना महामारीच्या जागतिक संकटाला सामोरे जात असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यानां दळणवळणाची सेवा एसटी मार्फत पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ९ मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हा-तान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी धावत आहेत. साहजिकच या कार्यामुळे  महाराष्ट्राची लोकवाहिनी ही बिरुदावली अभिमानाने मिरवणारी आपली लाडकी एसटी देशपातळीवरदेखील गौरवास पात्र ठरली आहे.