राज्यात आज २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, ५२२ नवे रुग्ण सापडल्यानंतर रुग्ण संख्या ८५९० वर

मुंबई :राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आज २७ कोरोनाबाधितांचा राज्यात मृत्यू झाला. आतापर्यंतच्या मृतांमध्ये आज सर्वाधिक मृत्यू

 मुंबई  : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आज २७ कोरोनाबाधितांचा राज्यात मृत्यू झाला. आतापर्यंतच्या मृतांमध्ये आज सर्वाधिक मृत्यू झाले. तर राज्यात ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या ८५९० वर पोहचली आहे. तर ९४ रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याने तब्बल १२८२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  राज्यात सोमवारी २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या ३६९ वर पोचली आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १५, अमरावती ६, पुणे ४ तर जळगाव १ आणि औरंगाबाद १ आहे. अमरावतीमधील मृत्यू २० ते २५ एप्रिलदरम्यानचे आहेत. मृतांमध्ये १५ पुरुष तर १२ महिला आहेत.

यात ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.  तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या १,२१,५६२ नमुन्यांपैकी १,१२,५५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,४५,६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.