राज्यात ३३९० नवे रुग्ण;  १२० जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात काही दिवसांपासून सलग तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असून रविवारीही ३३९० नवे रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ९५८ वर पोहोचली आहे.

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सलग तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असून रविवारीही ३३९० नवे रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ९५८ वर पोहोचली आहे. राज्यात ५३ हजार १७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे रविवारी १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३९५० वर पोहोचली आहे. तसेच १६३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ५० हजार ९७८ करोना बाधित रुग्ण बरे झाल्याने रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के एवढे आहे.

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मुंबई ६९,ठाणे ४,उल्हासनगर ५, पालघर १ , वसई विरार १, पुणे ११, सोलापूर ३, नाशिक  ३, जळगाव ११, रत्नागिरी १, औरंगाबाद ७, उस्मानाबाद २, अकोला २ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ % ) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जूनदरम्यानचे आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव ८, नाशिक ३, ठाणे ३, उल्हासनगर ३, रत्नागिरी १, पुणे १ मृत्यू असे आहेत.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,५७,७३९ नमुन्यांपैकी १,०७,९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८७,५९६ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात१५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७,१८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९,६४१लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.