ईडीने घरांवर छापा टाकल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया, परमबीर सिंग यांच्या संशयास्पद वागण्याचाही केला खुलासा

अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा(ED Raid On Anil Deshmukh`s House) टाकला. अनिल देशमुख यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा(ED Raid On Anil Deshmukh`s House) टाकला. यामध्ये अनिल देशमुख यांची सविस्तर चौकशी केल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुख यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  “सीबीआय, ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ईडीचे अधिकारी आज चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांना पूर्ण सहकार्य केलं. पुढील काळातही करू”, असं ते म्हणाले.

  “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं”, या आपल्या भूमिकेचा देखील अनिल देशमुख यांनी पुनरुच्चार केला आहे.

  दरम्यान, यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची भूमिका आपल्याला नेमकी संशयास्पद का वाटली, याविषयी देखील भाष्य केलं आहे.

  “परमबीर सिंह आयुक्त असताना प्रामुख्याने मुकेश अंबांनींच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्यात आलं. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यात एपीआय सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ सुनील माने असे पाच पोलीस हे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सीआययू विभागात कामाला होते. ते सगळे परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. शासनाला माहिती मिळाली की हे सगळे सगळे या प्रकरणात गुंतले आहेत, तेव्हा परमबीर सिंह यांची आयुक्त म्हणून भूमिका संशयास्पद होती”, असं देशमुख यावेळी म्हणाले.

  “अंबानींच्या घराबाहेरची स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. हे अधिकारी तुरुंगात आहेत. अशा संशयास्पद भूमिकेमुळेच त्यांची बदली केली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआय नियमानुसार त्याची चौकशी करत आहे. त्यातून सत्य जनतेसमोर येईलच. सीबीआय, ईडीला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य राहील”, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले.