भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण – दिवंगत आरोपी स्टॅन स्वामींबाबतची सर्व वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयात सादर

स्टॅन (८४) स्वामी (Stan Swamy)यांच्या सर्व वैद्यकीय कागदपत्रांचा (Medical Document)संच तळोजा कारागृह प्रशासन आणि वांद्रे येथील होली फॅमिलीकडून मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात(High Court) सादर करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने दंडाधिकारीमार्फत चौकशी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

    मुंबई : भीमा – कोरेगाव हिंसाचार(Bheema Koregav Violence Case) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad)आरोप प्रकरणातील दिवंगत आरोपी स्टॅन (८४) स्वामी (Stan Swamy)यांच्या सर्व वैद्यकीय कागदपत्रांचा संच तळोजा कारागृह प्रशासन आणि वांद्रे येथील होली फॅमिलीकडून मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने दंडाधिकारीमार्फत चौकशी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

    एनआयएने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्टॅन स्वामी यांना एल्गार परिषद प्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. तेव्हापासून स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांना पार्किन्सन्सचा आजार होता. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अपील केले आहे. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने स्वामी यांना होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. ५ जुलै रोजी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला त्यानंतर त्यांची तब्येत आणखी ढासळली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

    स्वामींच्या मृत्यूनंतर तळोजा कारागृहातील रुग्णालयात असताना त्यांना तीनवेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. कोरोनाची लागणही झाली. तळोजा कारागृह प्रशासन, राज्य सरकार, एनआयएने अक्षम्य हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप वकील ॲड. मिहिर देसाई यांनी केला होता. तसेच त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयाने मागवावा असेही त्यांनी म्हटले होते. देसाई यांच्या आरोपांच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी न्यायालयाने वैद्यकीय अहवाल मागवला होता. त्यानुसार मंगळवारी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी तळोजा कारागृह प्राधिकरणाने स्वामींचा ३०० पानांचा वैद्यकीय अहवाल, कागदपत्रं आणि शवविच्छेदनाचा अहवालही न्यायालयात सादर केला.

    तसेच स्वामींना भरती करण्यात आलेल्या होली फॅमिली या खासगी रुग्णालयानेही वैद्यकीय नोंदी सादर केल्या. ती सर्व कागदपत्रे खंडपीठाने रेकॉर्डवर घेतली आणि स्वामींचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने सीआरपीसीच्या कलम १७६ अन्वये त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी केली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट करत सुनावणी १९ जुलैपर्यंत तहकूब केली.