भिवंडीतील चावींद्रा ते वडपे बायपास रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

भिवंडी: भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या चावींद्रा ते वडपा रस्त्यावर लाखो रुपये खर्च करूनही या रस्त्यासाठी पावसाळी खड्डे भरण्याकरिता निधी उपल्बध होऊनही या रस्त्यावर जागोजागी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालवून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मात्र शासकीय यंत्रणा या खड्ड्यांकडे व रस्त्याच्या दुरावस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे गेल्याच वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र एक वर्षही पूर्ण न होता सध्या या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरलेआहे. रस्त्यावर पडलेल्या या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवरून जाताना दुचाकी व इतर वाहनांचा अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व या रस्त्याच्या दुरुस्तीचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भिवंडी पंचायत समितीचे सभापती विकास भोईर यांनी भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.