राज्य सरकार हम करे सो कायदा अशा पद्धतीने वागत असल्याने राज्यात सध्या अघोषित आणिबाणीच – भाजपने केला आरोप

आजही कॉंग्रेसच्या सोबत सत्तेत बसून शिवसेनेने अघोषित आणिबाणी लादली असून राज्यात पत्रकारांपासून राजकीय कार्यकर्ते आणि विरोधात बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दमन केले जात आहे.

    मुंबई : राज्यात सध्या केवळ हम करे सो कायदा पद्धतीने सरकार वागत आहे. त्यामुळे सध्या देखील अघोषित आणिबाणिच(Emergency) लादण्यात आली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे(Bhartiya Janta Party) प्रवक्ता केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी केला आहे. ते म्हणाले की, कारवाई आणि अटक टाळण्यासाठी आणिबाणीत शिवसेनेने इंदिरा गांधी यांच्या समोर गुडघे टेकले होते.

    ते म्हणाले की, बरोबर ४६ वर्षांपुर्वी आपल्या देशात आणीबाणी लादण्यात आली. सत्ता, स्वार्थ आणि अहंकार या पोटी जगातील सर्वात मोठ्या देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली त्यावेळी भाजप आणि जनसंघाच्या नेत्यानी तुरुंगवास पत्करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. ते म्हणाले की आजही कॉंग्रेसच्या सोबत सत्तेत बसून शिवसेनेने अघोषित आणिबाणी लादली असून राज्यात पत्रकारांपासून राजकीय कार्यकर्ते आणि विरोधात बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दमन केले जात आहे.


    अत्याचाराविरोधात बोलणाऱ्यांवर अन्याय
    ते म्हणाले की कोविड-१९ चे कारण सांगत सरकारने पत्रकारांना साधा रेल्वे प्रवास देखील करण्याची मुभा दिली नाही. तर बोगस लसी महिला अत्याचाराविरोधात बोलणाऱ्यांवर अन्याय आणि कोरोना उपाय योजना करताना त्यातही प्रचंड भ्रष्टाचार केला जात आहे. एसटी कर्माचारी, कोविड योध्दे, परिचारिका अंगणवाडी सेविका यांच्या वेतनाचे पैसे देखील शासन देत नसून केवळ हम करे सो पद्धतीने सरकार वागत आहे त्यामुळे सध्या देखील अघोषित आणिबाणीच लादण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.

    निवडणुकांना स्थगितीची मागणी
    ते म्हणाले की, ओबीसीच्या आरक्षणासाठी आज पक्षाचे नेते राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांना भेटले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारने निवडणुकांना स्थगिती मागण्याची मागणी केली आहे. याच मुद्यावर भाजपचे आज जेल भरो आंदोलन असून सर्व नेते राज्यात अनेक ठिकाणी जावून मार्गदर्शन करत आहेत.

    तपासात काही तथ्य असेल तर कारवाई
    अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेली कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असून युपीएच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणा जशा सरकारच्या पोपट असल्यासारख्या काम करत होत्या ती स्थिती आज नाही असा दावा उपाध्ये यांनी केला आहे. याबाबत तपासात काही त थ्य असेल तर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.