दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर भाजपचं महाएल्गार आंदोलन

  • दूधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर १० रूपये प्रमाणे राज्य सरकारने अनुदान द्यावं किंवा गाईचे दूध प्रतिलीटर ३० रूपये दराने खरेदी करावे. या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर दूधाच्या गाड्या अडवून आंदोलन केलं आणि सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

दूध दरवाढीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आजपासून दूध उत्पादक आणि भाजपच्या महाएल्गार आंदोलनाला सुरूवात झाली आहे. अनेक गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व दुकानं, होटल्स बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दूधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज अमरावती येथे भाजप आणि किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. अकोले येथे किसान सभेच्या नेतृत्वाखाली दगडाला दूधाचा अभिषेक घालत आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

दूधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर १० रूपये प्रमाणे राज्य सरकारने अनुदान द्यावं किंवा गाईचे दूध प्रतिलीटर ३० रूपये दराने खरेदी करावे. या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर दूधाच्या गाड्या अडवून आंदोलन केलं आणि सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच या झोपलेल्या सरकारला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधिंच्या घरातील दूध बंद करू असा इशारा माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे. 

दुधाला अनुदान द्यावे या मागणीसाठी माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी संत नामदेव पायरीचं दर्शन घेऊन, चंद्रभागा नदीत जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून सकाळी ७ वाजता आंदोलनाला सुरूवात केली आहे. हे आंधळे, मुके आणि बहिऱ्याचे सरकार म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी नामदेव पायरी येथे दूध आंदोलन केलं.

पंढरपूर मंगळवेढा रोडवर टायर पेटवून दूध आंदोलनाला सुरुवात झाली असून रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे दुधाला दर वाढवून देण्याची मागणी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्याचप्रमाणे मावळमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरूवात झाली आहे.