‘जिवाका’ रोबोट करणार कोरोनाला अटकाव

  • मध्य रेल्वे : परळ कार्यशाळेच्या टीमची निर्मिती

मुंबई.   मध्य रेल्वेचा परळ कार्यशाळेच्या टीमने कोविडपासून बचाव करता यावा याकरिता मेडी-बोट ‘जिवाका’ हे नवीन यंत्र तयार केले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे मंगळवार पार पडलेल्या एका कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व विभागांचे प्रधान विभाग प्रमुख आणि पाचही विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऑनलाइन उपस्थित होते. ड्रोनस्टार्क आणि बीजीएन मेडटेक्स (इंडिया) प्रा.लि. यांच्या सहकार्याने परळ कार्यशाळा लिमिटेडने जीवाका या मेडी-बोटची संकल्पना आखली आणि डिझाइन केली.

कोविड वॉरियर्सना चांगल्या सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नात आणि संजीव मित्तल यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन या कार्यशाळेने सध्याच्या कोव्हीड-१९ साथीच्या काळात वापरासाठी वैद्यकीय रोबोटची रचना व संकल्पना तयार केली आहे. प्रधान मुख्य यांत्रिक इंजिनिअर ए.के. गुप्ता, मुख्य कार्यशाळा इंजिनिअर बी.एम. अग्रवाल, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक विवेक आचार्य यांनी परळ कार्यशाळेच्या टीमला मार्गदर्शन केले.

उपचारादरम्यान करणार मदत
नवनिर्मित ‘जिवाका’ रोबोट यंत्रामुळे कोविड रुग्णांशी असलेला आरोग्य सेवकांचा संपर्क कमी होईल. ‘जिवाका’ रिमोट-कंट्रोल रोव्हर रुग्णांच्या बेडवर जाण्यासाठी चिन्हांकित ओळींचे अनुसरण देखील करू शकतो. रक्तदाब मोजणे, ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान तपासणे या विविध क्रिया करण्यासाठी रोबोटचा वापर केला जाणार आहे. ‘जिविका’ डॉक्टर आणि रूग्णाशी बोलू शकतो. त्याचप्रमाणे पडद्यावर रुग्ण पाहून व्हर्च्युअल तपासणी करु शकतो. यामध्ये इनबिल्ट डिव्हाइस आहे जे रुग्णांचे तापमान, रक्तदाब, हृदय गती आणि ऑक्सिजन पातळीचे परीक्षण करते. हे सर्व मापदंड त्यांच्या चेंबरमध्ये बसून डॉक्टरांद्वारे तपासले जाऊ शकतात. रुग्णांची व्हर्च्युअल तपासणी केल्यास डॉक्टर आणि पॅरामेडिक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात लक्षणीय घट होईल. ‘जिवाका’कडे औषधाची पेटी देखील आहे. याद्वारे रुग्णाला नियमित औषधे दिली जाऊ शकतात. एकदा पूर्ण तपासणी झाल्यावर आणि रुग्णाला औषध दिले गेले की, रोबोटला पुन्हा निर्जंतुकीकरणासाठी त्याच्या डेकवर बोलावण्यात येईल. कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतला आहे. त्यांच्यातर्फे कोविड वॉरियर्सच्या वापरासाठी येथे मुखपट्ट्या, पीपीई कव्हरेल्स, सॅनिटायझर, ऑक्सिजन ट्रॉलीची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे डब्ब्यांना कोविड आयसोलेशन डब्ब्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.