राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांना मिळणार रोजगाराची संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’(Business Map Of Maharashtra) तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या आरखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, या माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)यांनी सांगितले.

    मुंबई:  राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील,  हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’(Business Map Of Maharashtra) तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या आरखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, या माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)यांनी सांगितले. त्यांनी राज्यशासन गुंतवणूकदाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाहीही यावेळी दिली.एका दैनिकाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

    स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथे उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केले जाईल असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या आजच्या संकटकाळात आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असलो तरी आपल्यासमोर यातून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत त्यापैकी एक रोजीरोटीचे आहे. महाराष्ट्राने या आव्हानाचे संधीत रुपांतर करतांना कोरोनाच्या काळातही उद्योग व्यवसायांना दिलासा देण्याचे काम केल्याचे व अनेक नवनवीन उपक्रम सुरु केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आज कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला  दिसत असतांना आपण हळुहळु काही गोष्टी सुरु केल्या आहेत. हा मधला काळ मागे वळून पाहण्यासाठीचा आहे. आपण काय केले आणि काय केले पाहिजे या धोरणात्मक बाबींच्या निश्चितीसाठी हा वेळ उपयोगी लावला जात असून महाराष्ट् गुंतवणूकदारांसाठी  “आपलेपणा”ची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपल्यापैकी काही जणांची जन्मभूमी आहे पण अनेकांची कर्मभूमीही आहे.  या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्राला “आपलं” समजून या राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा “ब्रॅण्ड ॲम्बेसिडर” म्हणून काम करावे अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.