दिलासादायक : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे ; दिवसभरात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनामुक्त

राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

    राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काल दिवसभरात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनामुक्त झाले तर रिकव्हरी रेट ८६.०३ टक्के इतका आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मात्र अशात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

    राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,२८,२१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.