काँग्रेस नेत्यांसाठी ब्रेक द चेन निर्बंध शिथील करण्याबाबतचे अधिकृत आदेश ठरलेत ब्रेक द अलायन्स ? मुख्यमंत्र्याना भेटून व्यक्त करणार नाराजी

काँग्रेस(Congress)पक्षातील मंत्र्यांना महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारमध्ये दुय्यमपणाची वागणूक दिली जात असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याने हा प्रकार संतापजनक असून त्याबाबत मुख्यमंत्र्याना नाराजी कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

  किशोर  आपटे, मुंबई : ४ जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्री(Chief Minister Office) कार्यालयातून ब्रेक द चेन(Break The Chain) निर्बंध शिथील करण्याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित झाले. मात्र दोन दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेवून माहिती दिल्यानंतर हे आदेश अंतिम नसून विचाराधीन आहेत असे सांगण्यात आले होते.

  या प्रकारानंतर विरोधकांनी सरकारमध्ये तीन पक्षांचा समन्वय नसून श्रेयवादाची लढाई असल्याचा आणि त्यात आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेल्या जनतेचा भ्रमनिरास झाल्याचा आरोप केला होता. आता तेच आदेश अधिकृतपणे निर्गमीत करण्यात आले आहेत. त्यानंतर काँग्रेस पक्षातील मंत्र्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यमपणाची वागणूक दिली जात असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याने हा प्रकार संतापजनक असून त्याबाबत मुख्यमंत्र्याना नाराजी कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

  काँग्रेस नेत्यांना दुय्यमतेची वागणूक
  वडेट्टीवार यांनी त्यांच्या विभागाच्या बैठकीनंतर दिलेल्या माहितीबाबत ज्या तातडीने मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयातून इन्कार करण्यात आला त्याने काँग्रेस नेते दुखावले आहेत, असे ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

  गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध असूनही सरकारने अपेक्षीत कार्यवाही न करता कायदेशीर कारणे सांगत विलंब केला आहे. आणि दुसरीकडे खुल्या प्रवर्गातील पदोन्नती देण्याचा धडाका लावला आहे. तर या पूर्वी ,मागील वर्षी टाळेबंदीच्या काळातील विज बिले माफ करण्याच्या, तसेच १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या काँग्रेस मंत्र्याच्या घोषणेलाही सरकारमधून पांठिंबा न देता असा निर्णयच घेता येत नसल्याचे सांगत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या, असे हा नेता म्हणाला.

  राष्ट्रवादीचे मंत्री धोरणात्मक निर्णय कसे जाहीर करतात?
  इतकेच नव्हे तर वडेट्टीवार यांनी ज्या माहितीची घोषणा पत्रकारांसमोर केली त्यावेळी ‘बैठकीत चर्चा झाली’ असे त्यांनी सांगितले होते. तसेच स्वत: मुख्यमंत्री त्या बैठकीत हजर होते. त्यानंतरही ही माहिती अधिकृत नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगणे अपमानकारक असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे.

  या नेत्याने सांगितले की, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अनेकदा कोविड बैठकांनतर त्यांच्या खात्याच्या निर्णयांची घोषणा केली आहे. त्याला मुख्यमंत्री कार्यालयातून आक्षेप घेण्यात आले नाहीत. इतकेच काय टोपे यांनी अन्य विभागांच्या अखत्यारीत असणारे विषय जसे की शिक्षण, दहावी बारावी परिक्षा, मुंबईची लोकल सेवा आणि परिवहन सेवे बाबतही अनेकदा सरकारचा प्रवक्ता असल्यासारखे माहिती दिली आहे त्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून कधीच आक्षेप घेण्यात आला नाही.

  राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतात त्यालाही मुख्यमंत्री कार्यालयातून आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. मग केवळ वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीबाबत असे का करण्यात आले? असा या नेत्यांचा सवाल आहे. जी माहिती काही तासांत मुख्यमंत्री कार्यालयामार्फत जशीच्या तशी मांडण्यात आली आहे तिलाच त्यापूर्वी अधिकृत नाही असे का सांगण्यात आले? असा सवाल या काँग्रेस मंत्र्याने उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतात असे म्हटले आहे. तरी राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्याना हा निकष मग का लागू होत नाही? असा सवालही या नेत्याने उपस्थित केला आहे.

  मुख्यमंत्र्याना भेटून नाराजी व्यक्त करणार
  या मुद्द्यांबाबत वडेट्टीवार यांनी विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना तक्रार केली असून मुख्यमंत्र्याना भेटून ज्येष्ठ नेते यावर नाराजी व्यक्त करणार आहेत. मात्र आपत्ती व्यवस्थापन बैठकीतील चर्चा झाल्यावर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यानी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत योग्य असल्याचे तपासून घेतले आणि त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.