म्हसळयात कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला १११वर

म्हसळा : कोरोना प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात फक्त ३३ रुग्ण कोरोनाबाधित सापडले होते. त्यापैकी २९ रुग्ण बरे झाले . तसेच ४ रुग्णांचा मृत्यू झाला.  जून अखेर ग्रीन झोन असलेला म्हसळा तालुका जुलै महिन्याच्या १५ दिवसांमध्ये रेड झोनमध्ये गेला. अवघ्या १५ दिवसांमध्ये म्हसळा तालुका शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत गेल्याने बघता बघता ७८ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा आज १११ वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या २ दिवसांमध्ये १० रुग्ण वाढले आहेत.

पंधरा जुलै रोजी दोन रुग्ण तर १६ जुलै रोजी ८ रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत तर आज एक महिला रुग्ण मरण पावली आहे. मृत रुग्णांची संख्या आता ७ आहे. तीन जून रोजी चक्रीवादळाचे संकट कोसळले आणि कोरोनाला विसरून चाकरमानी, तालुक्याबाहेरील लोक म्हसळा तालुका बाजारपेठेत बिनधास्तपणे वावरू लागले. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे. बाधितांचे संपर्कातील लोकांची संख्या वाढत असल्याने हळूहळू तालुका कोरोनाच्या विळख्यात सापडत चालला आहे. म्हसळा तालुक्यातील स्थानिक प्रशासन पातळीवर २ जुलै ते ८ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात आला होता. आता पुन्हा १० दिवसांसाठीचा लॉकडाऊन असल्याने लोकांना कोरोनाची साखळी तोडण्यात किती यश मिळेल, यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.