कोरोनाची दौंड तालुक्यात एंट्री ; एका ज्येष्ठास कोरोनाची लागण

दौंड : दौंड तालुक्यातील दहिटने येथील एका जेष्ठ नागरिकाला बुधवार (ता.२९) रोजी कोरोनाबाधित असल्याचे आढळून असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली. लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात २१

दौंड :  दौंड तालुक्यातील दहिटने येथील एका ज्येष्ठ  नागरिकाला बुधवार (ता.२९) रोजी कोरोनाबाधित असल्याचे आढळून असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली.

    लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात २१ दिवसांमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणारा एकही रुग्ण दौंड तालुक्यात आढळला नाही. तालुका प्रशासन, आरोग्य विभागाने या संदर्भात कमालीची दक्षता बाळगली. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता असे चित्र असतांना लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात १५ दिवसांनंतर दहिटने येथील जेष्ठ पुरुषाला ससून रुग्णालयात दाखल केले असता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल बुधवारी धडकला. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांसह महसूल व पोलिस प्रशासन कमालीचे हादरले आहेत.

_तालुका प्रशासन  खडबडून जागे झाले

   ६० वर्षीय जेष्ठ पुरुषाला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याप्रकाराने तालुका प्रशासन अक्षरक्षः खडबडून जागे झाले आहे. सर्दी, खोकला व घसा दुखत असल्याने संबंधित व्यक्ती २५ एप्रिल रोजी राहू येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी गेला असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधितामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबंधित जेष्ठ नागरिकाचा कोरोना अहवाल बुधवार (ता.२९) रोजी पॉझिटिव्ह आला.

   तसेच दौंड तालुक्यात हा पहिलाच कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला असून यामुळे दौंड तालुक्यात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड आरोग्य  अधिकारी डॉ. रासगे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या जेष्ठ नागरिकाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.

     दरम्यान, खबरदारी म्हणून संबंधित परिसर सील करण्यात आला असून पाच किलोमीटरच्या परिसरामधील गावातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे, तसेच परिसरातील सर्व रहिवाशांना बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाचे पथकाने संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, मंगळवार रात्रीपासून दौंड तालुक्यात याबाबत अफवांचे पीक आले असून, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन तहसीलदार संजय पाटील यांनी केले आहे.