मुंबई : राज्यात आज २०९१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ७५८ झाली आहे.तर तब्बल ९७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये गेल्या दोन दिवसातील मृतांचीसुद्धा नोंद

 मुंबई : राज्यात आज २०९१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ७५८ झाली आहे. तर तब्बल ९७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये गेल्या दोन दिवसातील मृतांचीसुद्धा नोंद आहे. राज्यातील मृतांची संख्या १७९२ वर पोहचली आहे. मंगळवारी राज्यात ११६८ रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याने आजपर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. 

त्यामध्ये मुंबई ३९, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, पुण्यात ८ , सोलापूरात ७, औरंगाबाद मध्ये ५, मीरा भाईंदरमध्ये ५, मालेगाव मध्ये ३ आणि उल्हासनगर मध्ये ३, तर नागपूर शहर १ आणि रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ६३ पुरुष तर ३४ महिला आहेत. मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ९७ रुग्णांपैकी ६५ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १७ एप्रिल ते २३ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६२ मृत्यूंपैकी मुंबईचे १९, ठाण्याचे १५, कल्याण डोंबिवलीचे ९, सोलापूरचे ६, मीरा भाईंदरचे ५, उल्हासनगरचे ३ आणि मालेगावचे ३ तर पुण्यातील १ आणि औरंगाबाद मधील १ मृत्यू आहे.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,९०,१७० नमुन्यांपैकी ५४,७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २५६२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,७८० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,६७,६२२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,२०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.