लॉकडाऊनच्या काळात कोरोना संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची आत्तापर्यंत राज्यात नोंद – अनिल देशमुख

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोरोना संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २१२ घटना घडल्या. त्यात ७५० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोरोना संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २१२ घटना घडल्या. त्यात ७५० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ११ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,०४,४४९ गुन्हे नोंद झाले असून १९,८३८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर प्रचंड भडिमार झाला. ८९,७३८ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६६७ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,६३,४९३ व्यक्ती क्वारंटाईन आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,३९,६४० पास देण्यात आले आहेत.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५६,४७३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने  मुंबईतील ४, पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ७ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात ९० पोलीस अधिकारी व ७२९ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.  राज्यात एकूण ४०१९ हजार रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३,८८,९४४  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.