कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबत निर्णय ; वैद्यकीय परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केल्याने राज्यातील सर्व विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठानेही वैद्यकीय

 मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केल्याने राज्यातील सर्व विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठानेही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र सध्या राज्यातील बिघडत असलेली परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भात नियोजन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसेवेसाठी पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १२ ते १८ मे दरम्यान असलेली पदव्युत्तर अभ्यासक्रमाची उन्हाळी परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमडी, एमएस, डिप्लोमा आणि एमएससी कोर्सेसच्या परीक्षा १५ ते २२ जून दरम्यान घेण्यात येणार होत्या. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थी हे कोरोना रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहिल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे १५ जूनला असणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. आढावा घेतल्यानंतर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.