देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील : संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    मुंबई : देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून मला खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    दरम्यान यावेळी त्यांना फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या वेदना मला समजतात. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली असे फडणवीसांना वाटते. पण फडणवीस हे माझे मित्र होते आणि राहतील. त्यामुळे मी त्यांची टीका गांभीर्याने घेत नाही. पण देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे पाहून चांगले वाटले. यापूर्वी मी सुद्धा एकदा लंचसाठी त्यांना भेटलोय, आता पुन्हा भेटू. देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन-चार वर्ष विरोधी पक्षात राहून टीका करण्याचा आनंद घ्यावा. मला ते आवडेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    विरोधी पक्ष हळूहळू जमिनीवर येतोय – राऊत

    देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे विरोध पक्ष हळूहळू जमिनीवर येत असल्याचे द्योतक आहे. एक दिवस कदाचित देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील. निवडणुका आल्यावर आपण एकमेकांवर टीका करतोच, मग आता परस्परांवर विनाकारण धुरळा कशाला उडवायचा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.