विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलण्याचा सरकारचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

सत्ताधारी आघाडीत नेत्यांचा एकमेकांवर आणि आमदारांवर विश्वास नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी केली.

  मुंबई: महाराष्ट्राच्या(Maharashtra) साठ वर्षांच्या काळात जे कधीही घडले नाही ते आता होत आहे. सत्ताधारी आघाडीत नेत्यांचा एकमेकांवर आणि आमदारांवर विश्वास नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी केली. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे बहुमत आहे, तर घाबरता का ? असा सवालही त्यांनी सत्ताधारी आघाडीला केला आहे.

  ६० वर्षांत हे कधीही घडले नव्हते
  राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी आज पत्रकारांसमोर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या. ओबीसीच्या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, हात वर करुन का ? घ्या मतदान, पाहूया ताकद. राज्याच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर” अशी टीका फडणवीस यांनी केली.

  फेब्रुवारीपूर्वी ‘हे’ करणे आवश्यक
  फडणवीस म्हणाले की, ‘ओबीसीच्या इम्पेरिकल डाटा संबंधात छगन भुजबळ यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणावेळी आम्ही डेटा कसा गोळा केला, हे मी त्यांना सांगितले आणि सर्वोच्च न्यायालयाने तो कसा योग्य ठरवला, तेही सांगितले. तुम्ही पुढाकार घ्यावा, समित्या नेमाव्या, मी स्वत: नोंदी तयार करुन देईन, मी तुमच्या सोबत काम करेन, सत्तारुढ नेत्यांना नेतृत्व करावे लागते. मी पूर्ण सहकार्य करेन, असे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

  ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिल्याने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, पण फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणुका येतील. त्यापूर्वी हे करणे आवश्यक आहे.

  त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही
  पंकजा मुंडे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे