महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा, सरनाईकांच्या पत्राचा विषय निघालाच नाही, एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक(Mahavikas Aghadi Meeting) सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी समन्वय समितीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

    मुंबई : आज झालेल्या महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi) समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावाही एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समन्वय समितीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

    महामंडळाबाबत पेच सुटला

    पत्रकरांना माहिती देताना शिंदे यांनी सांगितले की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीला हजर होते. महामंडळांसदर्भात चर्चा झाली त्यानुसार लवकरच तीन पक्षांना महामंडळाचे वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणे महामंडळाचं वाटप होणार असल्याच्या बाबीवर सर्व पक्षाचे एकमत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार सिध्दिविनायक संस्थान शिवसेनेकडे आहे ते तसेच राहणार असून शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद अखेर राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचा दावा होता. मात्र आजच्या बैठकीत शिर्डीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.

    सरनाईकांच्या पत्रावर चर्चा नाही

    शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काहीच चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

    तिन्ही पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही
    महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार असल्याने तिन्ही पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असेही शिंदे म्हणाले. कोणताही समज गैरसमज नाही, तिन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत असे शिंदे म्हणाले.