शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी एसएलबीसीची बैठक तातडीने बोलवा – देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत, अशी मागणी माजी

 मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णत: ठप्प झालेली आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी तर नगण्य झाली आहे. राज्यात केवळ १९ लाख शेतकर्‍यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे आपल्याच २२ मे २०२० रोजीच्या शासकीय आदेशात नमूद आहे. या शेतकर्‍यांच्या खात्यांवर कर्ज दिसत असल्याने त्यांना नवीन कर्जसुद्धा मिळणार नाही आणि परिणामी आगामी खरीप हंगामाला सामोरे जाताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. अशा शेतकर्‍यांना खरीपाचे कर्ज देण्यासाठी बँकांनी ‘शासनाकडून येणे बाकी’ असे दाखवण्याबाबत आपण जीआर काढला आहे. मात्र, असे जीआर काढून उद्देश सफल होईल, याची शक्यता कमीच आहे. शेतकर्‍यांना खऱ्या अर्थाने लाभ देण्यासाठी तत्काळ राज्यस्तरिय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक बोलावावी आणि सर्व बँकांना विश्वासात घेऊन याबाबतची कारवाई करावी लागेल. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून त्यांच्याकडून तसे आदेश निर्गमित झाल्यासच असे करणे शक्य होणार आहे.
आज सर्व बँकांचे काम हे ऑनलाईन चालते. कोअर बँकिंगसाठी वापरल्या जाणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये ‘शासनाकडून येणे बाकी’ अशा कॉलमची तरतूद नाही. त्यामुळे या जीआरचा कितपत उपयोग होईल. रिझर्व्ह बँकेमार्फत या सूचना सर्व बँकांना गेल्या तरच त्याचा उपयोग होईल. त्यामुळे एसएलबीसीची बैठक बोलावून, सर्वांना विश्वासात घेऊन या आदेशांची अंमलबजावणी केली तर ते अधिक संयुक्तिक आणि प्रासंगिक ठरेल. त्यामुळे अशी बैठक तत्काळ बोलवावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.