भर पावसात उभं राहून, चिंब भिजत शरद पवारांनी घेतलेल्या या सभेनं गेल्या विधानसभा निवडणुकीचा माहौलच बदलला होता.
भर पावसात उभं राहून, चिंब भिजत शरद पवारांनी घेतलेल्या या सभेनं गेल्या विधानसभा निवडणुकीचा माहौलच बदलला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘त्या’ ऐतिहासिक जाहीर सभेची आज वर्षपूर्ती होतेय. राजकारणात काही मोजक्या सभा अशा असतात, ज्या त्या काळातील राजकारणाची दिशा बदलून टाकतात. शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा त्यापैकीच एक.

गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी शरद पवारांची ती ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेनं विधानसभा निवडणुकांचा नूरच बदलून गेला.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र २०१९ मध्ये तिथला एकेक बुरूज ढासळायला सुरुवात झाली. साताऱ्यातील राष्ट्रवादीचा चेहरा असणारे उदयनराजे भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपाची वाट धरली. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे दोन्ही दिग्गज भाजपात असल्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत साताःयाच्या विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले. १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर शरद पवारांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्यामुळं पवारांच्या सभेबाबतची उत्सुकता अधिकच वाढली होती. पाटणमधील सभा उरकून पवार साताऱ्यात पोहोचले आणि त्याचवेळी पाऊस सुरू झाला. पावसाची तमा न बाळगता पवार बोलायला उभे राहिले आणि लोकदेखील जागेवरून हलले नाहीत. पावसाचा जोर वाढल्यामुळे लोक भिजू लागल्याचं पाहून पवारांनीही त्यांच्या डोक्यावर धरलेली छत्री बाजूला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धो-धो पावसात पवार बॅटिंग करत राहिले आणि प्रेक्षक दाद देत राहिले.

“गेल्यावेळी माझी चूक झाली. ती दुरुस्त करण्याचं काम सातारकरांनी करावं” असं भावनिक आवाहन पवारांनी केलं. केवळ साताराच नव्हे, तर पूर्ण राज्याचं राजकारण या सभेनं बदलून टाकलं. पवारांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसनं या सभेची वर्षपूर्ती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका सभेचंही आयोजन करण्यात आलंय.