राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात, लाडक्या बाप्पाचं आगमन साधेपणाने

आजपासून संपूर्ण राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, आणि राज्यातील इतर भागांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे.

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचे सावट घोंघावत आहे. तसेच हे संकट दूर करण्यासाठी कित्येक भाविक बाप्पाकडे साकडं घालणार आहेत. आजपासून संपूर्ण राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, आणि राज्यातील इतर भागांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे.

दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत केलं जातं. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत बाप्पाचं आगमन केलं जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे आज गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचं आगमन होत आहे.

पुण्यातही आज मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. परंतु मानाच्या गणपतीसह कुठल्याही गणपतीचं भाविकांना दर्शन घेता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.