गोव्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात, पत्नीचा मृत्यू

उत्तर कर्नाटकात प्रवास करीत असताना अंकोला तालुक्यातील होसाकांबी गावाजवळ एका वळणावर त्यांची गाडी पलटली. हे सर्वजण यल्लापूर ते गोकर्ण असा प्रवास करीत होते. या अपघातात विजया नाईक या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

कर्नाटक -केंद्रीय आयूष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकात होसाकांबी गावाजवळ अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे.  अपघात झाल्यानंतर तातडीने श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यात आले , मात्र रुग्णालयात विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर कर्नाटकात प्रवास करीत असताना अंकोला तालुक्यातील होसाकांबी गावाजवळ एका वळणावर त्यांची गाडी पलटली. हे सर्वजण यल्लापूर ते गोकर्ण असा प्रवास करीत होते. या अपघातात विजया नाईक या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्या गाडीत असलेल्या तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे., यात श्रीपाद नाईक यांचाही समावेश आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले श्रीपाद नाईक हे भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचा संबंध आहे. दिवंगत नेते मनोहर परर्रिकर यांच्या निधनानंतर, गोव्यातील भाजपाचे प्रमुख नेते अशी श्रीपाद यांची ओळख आहे.