रायगडमधील लॉकडाऊन काळातील उपाययोजनांबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

पनवेल  : रायगड जिल्ह्यात करोना विषाणूच्या नियंत्रणासाठी दहा दिवसांसाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी निधी चौधरी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलिस अधीक्षक  अनिल पारसकर, पनवेल मनपा आयुक्त सुधाकर तसेच सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

 यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोरोनाबाधित रूग्णाला अडचणी येवू नये याकरिता प्रांत किंवा तहसिल कार्यालयात चोवीस तास कंट्रोल रूम सुरू करणे, रूग्णांसाठी दवाखान्यातील बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती दर्शविणारे ॲप तयार करणे, पनवेल मनपा हद्द तसेच उर्वरित जिल्हा अशा दोन वेगवेगळया समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, बेड मॅनेजमेंटसाठी सॉफ्टवेअर तयार करणे आदी सूचना करुन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून सीक्यूएमएस ॲपबाबत माहिती जाणून घेतली.

    यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी  परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील ॲम्ब्युलन्ससाठी २२ वाहनचालक नेमण्यात आले असल्याची तसेच  नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील रूग्णालय येथे १५० बेड्सचे कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.  या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या शेवटी जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन हा जनतेच्या भल्यासाठी असून सर्व अधिकाऱ्यांनी व यंत्रणांनी आपआपसातील उत्तम समन्वयाने कोरोनाची साखळी तोडू या, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.