विदर्भात गारपीट, तर राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पाऊस

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. विदर्भातील अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातील ९ तालुक्यात या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

    शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. विदर्भातील अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातील ९ तालुक्यात या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा या तालुक्यामध्येही गारपीट झाली. काढणीला आलेला गहू, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. रब्बी पिकांसह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.

    मराठवाड्यातील परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. सुमारा अर्धा तास पडलेल्या पाऊसामुळे जागोजागी गारा पडल्याचं दिसून आलं आहे. जालना जिल्ह्यातील हसनाबाद, भोकरदन, तळेगाव, सुरंगळी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    दरम्यान येत्या पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात आयएमडीने तीव्र हवामानाचा इशारा दिला असून, उद्यापासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करुन दिली होती.