कोकणात मुसळधार, नद्यांना पूर

अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

  सुरुवातीचे काही दिवस दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री मारली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या २४ तासांत सरासरी १५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर सर्वाधिक म्हणजे १५३ मिलिमीटर पाऊस राजापूर तालुक्यात पडला आहे.

  राजापुरातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून एक अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. कोदवली नदीला पूर आल्याने राजापुरात बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले.

  रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली गेला होता. कुंडलिका नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली असून मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी आलं होतं.

  मुसळधार पाऊस पडलेली काही ठिकाणे :

  रायगड जिल्हा – म्हसळा २१०, श्रीवर्धन २१४

  रत्नागिरी जिल्हा – दापोली २३०, चिपळूण १७७, हर्णे १६४,

  सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली २१०, मालवण १५२, वैभववाडी २०३

  दरम्यान अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.