महाड तळीये दुर्घटना
महाड तळीये दुर्घटना

महाराष्ट्र गेल्या ४० वर्षांतील सर्वात भीषण पूरस्थिती आणि मुसळधार पावसाचा सामना करतो आहे. जूनपासून राज्यात सुरु असलेल्या या पर्जन्यवृष्टीने २२८ जणांचा बळी घेतला असून, यातील २८ बळी हे गेल्या २४ तासातले आहेत. तर गेल्या ७८ तासांत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

  महाराष्ट्र गेल्या ४० वर्षांतील सर्वात भीषण पूरस्थिती आणि मुसळधार पावसाचा सामना करतो आहे. जूनपासून राज्यात सुरु असलेल्या या पर्जन्यवृष्टीने २२८ जणांचा बळी घेतला असून, यातील २८ बळी हे गेल्या २४ तासातले आहेत. तर गेल्या ७८ तासांत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

  राज्यातील २१ जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला असून, यातील सर्वाधिक प्रभावित असलेल्या साताऱ्यातील कोयनानगर परिसरात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा आहे. राज्यातील पूरस्थिती आणि बळींची संख्या लक्षात घेता यावेळी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे.

  तळीये गावात आत्तापर्यंत ५३ मृतदेह काढले, ३२ जण अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली

  रायगड जिल्ह्यात तळीये गावात २२ जुलैला संध्याकाळी दरड कोसळल्यानंतर पाचव्या दिवशीही मदतकार्य सुरु आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या तुकड्या स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करीत आहेत.

  महाड तळीये दुर्घटना

  सोमवारी सकाळपर्यंत दुर्घटनास्थळी ५३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, अजूनही ३२ जण ढिगाऱ्याखाली गाडले असण्याची शक्यता आहे. बचावकार्यातील वेळेचा विचार करता, आता ढिगाऱ्याखाली कुणीही जिवंत असण्याची शक्यता मावळली आहे. संततधार पाऊस आणि झालेला चिखल यामुळे बचावकार्यात वारंवार अडथळे येत आहेत.

  सर्वाधिक मृत्यू रायगड जिल्ह्यात

  राज्यात गेल्या ७२ तासांत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ६० मृत्यू हे रायगड जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. यासह साताऱ्या ४१, मुंबईत ४, सिंधुदुर्गात २, कोल्हापुरात ७, पुण्यात २, रत्नागिरीत २१ तर ठाण्यात १२ जणांचे प्राण गेले आहेत. यासह जूनपासून आत्तापर्यंत पूरस्थितीमुळे १०० जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. राज्यात अतिवृष्टीने ३,२४८ जनावरांचे मृत्यू झाल्याचीही नोंद आहे.

  एनडीआरएफच्या २५ तुकड्या, नौदलाच्या पाच, सैन्यदलाच्या ३, कोस्टगार्डच्या २ तर एसडीआऱएफच्या ४ तुकड्या बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत. या सर्वांनी एकत्रित २.२९ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

  यंदा मान्सूनमध्ये ३४ टक्के अधिक पर्जन्यवृष्टी

  राज्यात जून महिन्यापासून आत्तापर्यंत ३४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार २५ जुलैपर्यंत राज्यात ४६९.८ मिमी पाऊस होण्याची शक्यता होती, मात्र प्रत्यक्षात ६२९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  दुर्घटनांत जखमी झालेल्यांवर तातडीने उपचार

  अतिवृष्टीने दरड कोसळण्याच्या आणि इतर दुर्घटनांत जखमी झालेल्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. आरोग्य पथके लवकरात लवकर घटनास्थळी कशी पोहचतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत.