पोलादपूर तालुक्यात लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद

पोलादपूर : रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात आज शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात आला. व्यापारी संघटना व छोटे-मोठे दुकानदार व्यावसायिक या सर्वांनी कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलादपूर शहरातील सर्व व्यावसायिकांनी आज शंभर टक्के लॉकडाऊन पाळलेला दिसून येत आहे.

पोलादपूर तालुक्यात आत्तापर्यंत पोलादपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना  पॉझिटिव्ह एकूण ५२ रुग्ण आढळले असून पोलादपूर शहराची परिस्थिती नियंत्रणात असली तरीही ग्रामीण भागात कोरोना व्हायरस विषाणूने शिरकाव केल्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलादपूर तालुक्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून आपण सर्वांनी यावर मात करण्यासाठी सज्ज राहून शासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा पोलादपूर तालुका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र मुंबई पुणे सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोलादपूर तालुक्यात येत असलेले चाकरमानी यांनी शासनाचे नियमांचे पालन केल्यास पोलादपूर तालुका हा कोरोना मुक्त होईल, अशी अपेक्षा पोलादपूर तालुका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. याकामी पोलादपूर नगरपंचायत, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, गृहखाते व पोलादपूर पंचायत समिती या सर्वांनी नागरिकांना आवाहन केल्यानंतर पोलादपूर तालुक्यात शंभर टक्के बंद पाळून तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे.