” मोदी व शहांच्या प्रतिमांना गंज चढेल , ते होऊ द्यायचं नसेल तर त्यांना स्वतःला बदलावे लागेल” ; संजय राऊतांचा ‘इशारा

“पश्चिम बंगालच्या जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार आणि बदनामी ही शस्त्र आता जुनाट आणि बोथट झाली. याच न्यायाने उद्या मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना स्वत:ला बदलावे लागेल!” असं राऊत म्हणाले आहेत.

    मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाला आठवडा उलटला तरी त्याचे कवित्व सुरूच आहे. मोदी सरकारच्या विरोधकांनी त्यावरून भाजपला पुरतं घेरलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामानातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘खोटा प्रचार व बदनामी ही निवडणुकीतील शस्त्रं आता जुनाट व बोथट झाली आहेत. याच न्यायानं उद्या मोदी व शहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल तर त्यांना स्वतःला बदलावे लागेल,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

    शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’त लिहिलेल्या लेखात राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे विश्लेषण केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या लढ्याची तुलना त्यांनी अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशी केली आहे. मोदी-शहा का हरले, याची काही कारणं त्यांनी दिली आहेत. ‘नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पण निवडणूक काळात त्यांनी स्वतःला ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीत आणून ठेवलं. सर्वोच्च नेते म्हणून ते वागले नाहीत. त्यामुळं बंगालच्या लोकांना मोदींचं अप्रूप वाटलं नाही व ममतांसमोर उभ्या राहिलेल्या मोदींचा पराभव झाला,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    “पश्चिम बंगालच्या जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार आणि बदनामी ही शस्त्र आता जुनाट आणि बोथट झाली. याच न्यायाने उद्या मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना स्वत:ला बदलावे लागेल!” असं राऊत म्हणाले आहेत.’भाजपनं देशातील राजकीय संस्कृती व परंपरा मोडली, याचा फटका त्यांना बसला. हे त्यांनी स्वीकारायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

    ममतांच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना संजय राऊत यांनी काँग्रेसच्या घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘२०२४ च्या राजकीय पटलावर तेव्हा काँग्रेस कोठे असेल? ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीला नवी दिशा मिळेल काय? विरोधी पक्षानं एकत्र यायचं ठरलं तर त्या आघाडीचं नेतृत्व कोणी करावं?,’ असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.