uddhav thakre

राज्यात २५ जिल्ह्यात कोरोनाचा(Corona) बाधीत रूग्ण संख्यादर (पॉझिटिव्हीटी रेट)(Positivity Rate) पहिल्या टप्प्यात म्हणजेच पाच टक्क्यांच्या आत असल्याचे दिसून येत आहे.

  मुंबई: राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन सचिवांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे राज्यात २५ जिल्ह्यात कोरोनाचा(Corona) बाधीत रूग्ण संख्यादर (पॉझिटिव्हीटी रेट)(Positivity Rate) पहिल्या टप्प्यात म्हणजेच पाच टक्क्यांच्या आत असल्याचे दिसून येत आहे. निकषानुसार पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्केपेक्षा कमी असणाऱ्या जिल्ह्यांत निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे मात्र याबाबत अंतिम निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग स़्वतंत्रपणे घेणार आहे. या आदेशानुसार सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  निर्बंध शिथिल करण्यासाठी जिल्ह्यांची यादी
  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भर ओसरण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात झाल्याचे या ताज्या आकडेवारीतून दिसून येत आहे. राज्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी तर प्राणवायूयुक्त बेडची संख्या वाढली असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यात कठोर करण्यात आलेले निर्बंध ब्रेक द चेन अनलॉक अंतर्गत टप्याटप्याने  शिथिल केले जात आहेत. काही जिल्ह्यांत निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. प्रत्येक आठवड्याला आढावा घेत निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. त्यानुसार पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्या संदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  मुंबई लोकलचा निर्णय पालिका घेणार
  दरम्यान मुंबईचे दोन्ही जिल्हे (शहर आणि उपनगर) मध्ये निर्बंध हटवण्यासंदर्भात पंचस्तरीय कार्यपद्धतीनुसार पहिल्या टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले असले तरी मुंबई लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मात्र मुंबई महानगरपलिका आयुक्त यांच्याकडून घेतला जाणार आहे.

  याबाबत येत्या दोन दिवसांत घोषणा अपेक्षीत आहे. नवे निकष लागू करून दोन आठवडे झाले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात मुंबईचे निर्बंध हटवण्याविषयी निर्णय राज्य सरकारच्या प्रसिदी पत्रकातील निकषा नुसार आवश्यक आहे. पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असल्याने मुंबईकराना मोठा दिलासा मिळू शकतो.

  २५ जिल्हे पाच टक्के पेक्षा कमी
  पहिल्या गटात पाच टक्के पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेटअसणारे २५ जिल्हे आहेत त्यात अहमदनगर (३.०६), अकोला (४.९७), अमरावती (१.९७), औरंगाबाद (२.९४), भंडारा (०.९६), बुलडाणा (२.९८), चंद्रपूर (०.६२), धुळे (२.४२), गडचिरोली (३.५३), गोंदिया (०.२७), हिंगोली (१.९३), जळगाव (०.९५), जालना (१.५१), लातूर (२.५५), मुंबई (३.७९), नागपूर (१.२५), नांदेड (१.९४), नंदूरबार (३.१३), नाशिक (४.३९), परभणी (०.९४), सोलापूर (३.७३), ठाणे (४.६९), वर्धा (१.१२), वाशिम (२.७९), यवतमाळ (३.७९) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

  अकरा जिल्ह्यात स्थिती गंभीर
  असले तरी राज्यातील अकरा जिल्ह्यात अजून कोरोना रूग्ण संख्या आवाक्यात आलेली नाही त्यात कोल्हापूर, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्याना रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.  पाच ते १५ टक्के बाधित रूग्ण संख्या असलेले हे जिल्हे आहेत. बीड (७.११), कोल्हापूर (१३.७७), उस्मानाबाद (५.२१), पालघर (५.१८), पुणे (९.८८), रायगड (१२.७७), रत्नागिरी (११.९०), सांगली (८.१०), सातारा (८.९१), सिंधुदुर्ग (९.०६), यवतमाळ (५.२४)

   २५ जिल्हे पुन्हा सुरू होणार
  पहिल्या गटात येणाऱ्या २५ जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल.

  सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही शंभर टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू होतील.

  विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.