पोलीस ॲक्शन मोडमध्ये ; भऊर येथे पन्नास लिटर गावठी दारू जप्त

पोलिसांच्या या कारवाईचे समस्त ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. भविष्यात याच प्रकारे कारवाई करत गावात १०० टक्के दारूबंदी करण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

    देवळा: तालुक्यातील भऊर गावात १४ ऑगस्ट २०१९ पासून ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झालेला असतांना देखील ठीक ठिकाणी दारू विक्री होत होती. दारूबंदी कमिटी किंवा पोलीस प्रशासनाकडून या मागील काळात योग्य ती कारवाई केली जात नसल्याची सर्वत्र चर्चा होती. याबाबत दैनिक नवराष्ट्रने दि. ३ सप्टेंबर रोजी बातमी प्रसिद्ध करताच त्याच दिवशी सायंकाळी उशिरा देवळा पोलिसांनी भऊर येथे ठिकठिकाणी छापे टाकत ५० लिटर गावठी दारू जप्त केली.

    थातूरमातूर कारवाईची चर्चा बोदाडी वस्ती, भऊर येथील आदिवासी महिलांनी दि. २ रोजी एकत्र येत या वस्तीवरील अवैद्य दारू बाबत आक्रमक पवित्रा घेत अवैद्य दारू गाळप व विक्री बंदी केली. या बाबत दैनिक नवराष्ट्रने सर्वप्रथम दि. ३ रोजी ‘अवैद्य दारू विक्रीबाबत आदिवासी महिला आक्रमक’ ही बातमी प्रकाशित केली. या बातमीत पोलिसांची भूमिका संशयास्पद या गोष्टीवर भर देत पोलीस प्रशासन व दारूबंदी कमिटी थातुरमातुर कारवाई करत असल्याची गावात होणारी कुजबुज अधोरेखित केली होती. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत देवळा पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले. बातमी प्रसिद्ध होताच दि. ३ रोजी सायंकाळी उशीरा देवळा येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश सोनवणे यांच्यासह बाळू पवार, सुरेश कोरडे, श्रावण शिंदे, चव्हाण आदींनी भऊर येथे ठिकठिकाणी छापे टाकले. यात नेपाळी वस्ती येथून ५० लिटर अवैद्य गावठी दारू जप्त केली.

    पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
    पोलिसांच्या या कारवाईचे समस्त ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. भविष्यात याच प्रकारे कारवाई करत गावात १०० टक्के दारूबंदी करण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच नवराष्ट्रने योग्य विषयाला वाचा फोडल्याबद्दल भऊर ग्रामस्थांनी नवराष्ट्र चे आभार मानले. पोलीस कारवाई दरम्यान सरपंच दादा मोरे, पोलीस पाटील भरत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन पवार प्रहार संघटनेचे सुभाष पवार, प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर पवार सामजिक कार्यकर्ते नारायण पवार तसेच उमेश पवार, दीपक पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.