शेवटी मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच : काँग्रेस

'महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे, असं आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले.

  मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये भडका उडाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यावर टीका केल्यानंतर ‘शेवटी मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच’ असं म्हणत काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून जोरदार पलटवार केला आहे.

   

  आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या पत्राला ट्वीट करून काँग्रेसचे प्रत्युत्तर

  ‘अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरुवात केली आहे. शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच, अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली.

  ‘आपल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लसीकरणाची आकडेवारी देताना जाणीवपूर्वक महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाब या बिगर भाजप शासित राज्यांची सविस्तर आकडेवारी दिली. पण हे करत असतानाच इतर भाजप शासित राज्यांची विस्तृत आकडेवारी देण्यास ते जाणीवपूर्वक विसरले. महाराष्ट्रात होणाऱ्या सर्वात जास्त चाचण्यांचा उल्लेख केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सोईस्करपणे टाळला. कारण, तसे केल्यास भाजप शासित राज्यांनी कमी चाचण्याकरून कोरोना रुग्णांची आकडेवारी दाबण्याचा जो प्रकार चालावला आहे, तो उघडकीस आला असता, असा आरोपही काँग्रेसने केला.

  ‘लसींचा साठा मर्यादित असल्याने राज्यांशी चर्चा करुनच लसीकरण सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री सांगत आहेत, मात्र हे करत असताना राज्यांनी लसीची वेळोवेळी केलेली मागणी आणि ती पूर्ण करण्यात भाजप सरकारला आलेले अपयश याबद्दल तोंडातून चकार शब्दही काढायला ते तयार नाहीत’ असा टोलाही लगावला.

  ‘आज लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडत असताना लसींचा पुरवठ्यात आलेले अपयश झाकण्यासाठीच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी पत्रक काढून उर बडवायला सुरवात केली आहे. पण हे करत असतानाच IMA ने 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करावे या केलेल्या मागणीबद्दल मूग गिळून बसणे पसंत केले आहे’ अशी आठवण करून देत काँग्रेसने टोला लगावला.

  काय म्हणाले होते केंद्रीय आरोग्यमंत्री?

  केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आपली भूमिका पत्राद्वारे प्रसिद्ध केली आहे. या पत्रात हर्षवर्धन यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.’आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रूग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत, गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली. केंद्रीय चमू पाठविल्या. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले, याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. , अशी टीका आरोग्यमंत्र्यांनी केली.

  ‘महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे, असं आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले.