महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद, अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून करणार नियोजन

    मुंबई: अलमट्टी धरणातून(Almatti Dam) होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला(Flood Situation) सामोरे जावे लागते. पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र(Maharashtra) व कर्नाटक(Karnatak) या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant patil) यांनी दिली.

    जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

    कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.