जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त ,महापौर यांनी आंबिवली वनराईचा केला पाहणी दौरा

कल्याण : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या रिंग रोडमध्‍ये बाधित होणाऱ्या सुमारे २१०० झाडांच्‍या बदल्‍यात महापालिकेने आंबिवली परिसरात एमएमआरडीए. व वन विभागाच्‍या

 कल्याण : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या रिंग रोडमध्‍ये बाधित होणाऱ्या सुमारे २१०० झाडांच्‍या बदल्‍यात महापालिकेने आंबिवली परिसरात एमएमआरडीए. व वन विभागाच्‍या सहकार्याने सुमारे १५ हजार झाडे लावून जगविण्‍याचा संकल्‍प पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी याच जागी झाडे लावल्‍यानंतर आज १ वर्षानंतर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्‍य साधून आज महापौर विनिता राणे, महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर, अति. आयुक्‍त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्‍ली), उप आयुक्‍त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील व मुख्‍य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी आंबिवली परिसरातील या झाडांची पाहणी केली. सदर परिसरात एमएमआरडीएने दिलेल्‍या अर्थसहाय्यामुळे महानगरपालिकेने वड, पिंपळ, बदाम, आंबा, नागकेसर, शिसम,चेरी,पेरू, उंबर, फणस,बहावा, करंज, कडूनिंब, बकुळ, चिंच अशा विविध प्रकारच्‍या झाडांची लागवड केली आहे.

गेल्या वर्षी लावलेल्‍या आणि जवळपास सर्वच्‍या सर्व जगलेल्‍या झाडांचे प्रमाण पाहून सर्वांनीच समाधान व्‍यक्‍त केले. महापालिकेने हा एक यशस्‍वी प्रकल्‍प सर्वांच्‍या सहकार्याने साकारला आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी महापौर विनिता राणे यांनी केले, तसेच प्रकल्‍प राबविणा-या सर्व संबंधित अधिका-यांचे कौतुक केले. सौर उर्जेवर चालणा-या ठिबक सिंचनाच्‍या माध्‍यमातून नियोजनबध्‍द पध्‍दतीने साकारलेला हा अनोखा वन प्रकल्‍प भविष्‍यातील एक पर्यटन स्‍थळ म्‍हणून नावारूपाला येवू शकेल, असे उद्गार पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या पाहणी दरम्‍यान काढले. आजच्‍या वट पोर्णिमेचे औचित्‍य साधून महापौर विनिता राणे व शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्‍ली) यांनी सदर परिसरात वडाचे रोपटे लावले. आणि इतर उपस्थितांनीदेखील वृक्ष लागवड केली. आंबिवली परिसरात वाढणा-या गर्द वनराईमध्‍ये पुढील काळात पक्षी अ‍भयारण्‍य उभारण्‍यासाठी उपस्थितांनी शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्‍ली) व मुख्‍य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांना शुभेच्‍छा दिल्‍या.